मुंबई : पहिले दोन सामने अत्यंत वाईट पद्धतीने गमावल्यानंतरही स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या 'लालबाग लायन्स'ने आपल्या लौकिकानुसार खेळ करीत जावळीच्या वाघांची ३४-२३ अशी कत्तल केली.
अभिनव कला क्रीडा अकादमी आणि ओ एच मीडिया हाऊस आयोजित महामुंबई कबड्डी लिग स्पर्धेच्या प्ले ऑफ सामन्यात लालबाग लायन्सनं धडक मारली. आता प्ले ऑफमध्ये गटात अव्वल स्थान पटकावणारा कुर्ला किंग्ज आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला लालबाग लायन्स अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी एकमेकांशी भिडतील. लालबाग लायन्सविरूद्ध पराभव सहन करावा लागल्याने जावळीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून डी ऍण्ड डी टायटन्सने अंधेरी आर्मीचा ४८-२८ असा धुव्वा उडवून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे, तर कांदिवली कोब्राज आणि कुर्ला किंग्ज यांच्यातील थरारक सामना २४-२४ असा बरोबरीत सुटल्याने कोब्राजनेही प्ले ऑफमध्ये जागा करण्यात यश प्राप्त केले.
चारकोपच्या सह्याद्री नगरातील नामदेवराव कदम क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना थरारक लढतींना मनमुराद आनंद उपभोगता आला. प्ले ऑफ लढतीमधील स्थानांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा होता. त्यामुळे सारेच संघ विजयाच्या इर्षेने खेळले. लालबाग लायन्स आणि जावळी टायगर्स यांच्यात झालेल्या चकमकीत कबड्डीप्रेमींना क्षणाक्षणाला कबड्डीचा खराखुरा थरार अनुभवायला मिळत होता. लालबाग लायन्सच्या अभिनव नरने जोरदार सुरूवात केल्यामुळे पाचव्या मिनीटालाच जावळी टायगर्सवर त्यांनी लोण चढवला. त्यामुळे लालबाग लायन्सने प्रारंभीच ९-४ अशी आघाडी घेतली. पण जावळी टायगर्सच्या राकेश खैरनार आणि रोहित जाधवनेही चढायांचा अप्रतिम खेळ करीत आपल्या संघाचा गुणफलक हलता ठेवला. त्यांचा अथक प्रयत्नानंतरही त्यांचा संघ लालबागपेक्षा पुढे जाऊ शकले नाही. त्यामुळे मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा लायन्सकडे १६-१२ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतरही लालबागकडे आघाडी कायम होती, पण त्याचवेळी रोहित जाधवच्या काही भन्नाट चढायांनी सामन्यात जान आणली. गुणफलक २७-२१ असा असताना मैदानात लालबागचे केवळ दोनच खेळाडू होते. जावळीला लोण चढवून सामन्यात बरोबरी साधण्याची नामी संधी होती, त्या संधीचे सोने करण्यात जावळीचे टायगर्स अपयशी ठरले. अभिनव नरने दोघातच एक जबरदस्त पकड केली आणि संघावर असलेली लोणची नामुष्की टाळली. अभिनवने केलेल्या या सुपर पकडीमुळे लालबागची आघाडी आणखी वाढली आणि अखेर सामना ३४-२३ असा जिंकला. या पराभवामुळे जावळीचे स्पर्धेतील आव्हान डळमळीत झाले. लालबाग लायन्सच्या संदेश सणगरे आणि सुयोम राजापकर यांनी चढाया-पकडींचा अफलातून खेळ करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
मग कुर्ला किंग्ज आणि कांदिवली कोब्राज यांच्यातील सामना अनपेक्षितपणे बरोबरीत सुटल्याने कांदिवली कोब्राजने ३ गुण मिळवले आणि प्ले ऑफमध्ये आपले स्थान निर्माण केले. या सामन्यातही दादा आव्हाडचा सुरेख खेळ कबड्डीप्रेमींना पाहायला मिळाला. त्याने ९ गुणांची तर आकाश कदमने ६ गुणांची कमाई केली. कांदिवली कोब्राजच्या रोहित पाष्टे आणि सुनील यादवने चांगला खेळ केला. मध्यंतराला १५-१२ अशी आघाडी असूनही कुर्ला किंग्जला आपली विजयी घोडदौड कायम राखता आली नाही. १८ गुणांसह कुर्ला किंग्जने गटात आपले अव्वल स्थान कायम राखले तर लालबाग लायन्स १६ गुणांसह दुसऱया क्रमांकावर राहिला.
डी ऍण्ड डी टायटन्स आणि अंधेरी आर्मी यांच्यातील सामन्यावर पूर्णपणे धीरज धरीवलेचे वर्चस्व होते. स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करताना धीरजने चढायांच्या बळावर ११ गुणच संपादले नाही तर जबरदस्त पकडींचे ७ गुण मिळवित अंधेरी आर्मीची बचावपळी खिळखिळी करून सोडली. त्याला गणेश बोडके आणि सुशांत मांडवकर यांचीही जोरदार साथ लाभल्यामुळे डी ऍण्ड डीने आर्मीची ४८-२८ अशी धुळधाण उडविली. त्यांनी अंधेरी आर्मीचा डाव तीनदा गुंडाळला. पराभूत संघाकडून एकट्या नामदेव इस्वलकरचीच कामगिरी समाधानकारक झाली.