पल्लेकेले : महेंद्र सिंह धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या संयम खेळीने टीम इंडियाला दुस-या वन-डे सामन्यात विजय मिळवता आला. यावेळी धोनीने भुवनेश्वर कुमारला कानमंत्र दिला होता. याचा खुलासा स्वत: भुवनेश्वर कुमार याने केलाय.
जर धोनीने सांगितलेली ही गोष्ट भुवनेश्वर कुमारने ऎकली नसती तर कदाचित टीम इंडियाला हा विजय मिळवता आला नसता.
भुवनेश्वर कुमारने ५३ रन्स केलेत आणि धोनीसोबत आठव्या विकेटसाठी त्याने नाबाद १०० रन्सची भागीदारी केली. त्यानंतर भारताने हा सामना ३ विकेटने जिंकला. भुवनेश्वरने सामन्यानंतर सांगितले की, ‘जेव्हा मी बॅंटींगसाठी मैदानात आलो तेव्हा धोनीने मला टेस्ट क्रिकेटसारखा स्वाभाविक खेळ करण्याचा सल्ला दिला. तसेच त्याने सांगितले की, दबावात खेळू नको कारण ब-याच ओव्हर शिल्लक आहेत. आम्हाला माहिती होतं की, घाई न करता आरामात खेळलो तरी आम्ही टार्गेट पूर्ण करू’.
तो पुढे म्हणाला की, ‘मला माहिती होतं की, त्यावेळी गमवण्यासारखं काही नव्हतं. कारण आमच्या सात विकेट गेल्या होत्या. मी विचार करत होतो की, तितकी होईल तितकी एमएसची मदत करावी. मी तोच प्रयत्न केला’.
श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजयाने ५४ रन्स देऊन सहा विकेट घेतल्या आणि टीम इंडिया ढासळली. त्यानंतर धोनी आणि भुवनेश्वर या दोघांनी दमदार खेळ करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.