बांगलादेशविरुद्धच्या सीरिजमधूनही धोनीची माघार

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली विश्रांती आणखी वाढणार आहे.

Updated: Sep 23, 2019, 09:28 AM IST
बांगलादेशविरुद्धच्या सीरिजमधूनही धोनीची माघार title=

मुंबई : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली विश्रांती आणखी वाढणार आहे. नोव्हेंबरपर्यंत धोनी क्रिकेटपासून लांब राहणार आहे. जुलैमध्ये संपलेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली. यावेळी धोनी लष्कराच्या सेवेसाठी गेला. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमधूनही धोनीने माघार घेतली.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार एमएस धोनी विजय हजारे ट्रॉफी आणि बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्येही खेळणार नाही. भारतीय टीम ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे.

धोनी हा डिसेंबर महिन्यात निवडीसाठी उपलब्ध असेल, असं बोललं जात आहे. डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिज भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज ३ टी-२० आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.

डिसेंबरमध्ये धोनी पुन्हा मैदानात दिसला तर हा त्याच्यासाठी जवळपास ६ महिन्याचा ब्रेक असेल. ३७ वर्षांच्या एमएस धोनीच्या निवृत्तीच्या अफवाही गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.