Maldives tourism invites team india to celebrate : मुंगी शिरायला देखील जागा नाही, असा अभूतपूर्व नजारा संपूर्ण जगाने 4 जुलै रोजी पाहिला. मुंबईच्या मरिन लाईन्सपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियाच्या विजयाची भव्य रॅली निघाली. तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप नाव कोरल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतूक होताना दिसतंय. बीसीसीआयने भारतीय संघाला तब्बल 125 कोटींचं बक्षिस दिलं. अशातच टीम इंडियाला एका देशाने खास ऑफर दिली आहे.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजयानंतर मालदीव टुरिझमने टीम इंडियाच्या खेळाडूंना त्यांच्या देशात वर्ल्ड कप विजय साजरा करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन (MMPRC) आणि मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्री (MATI) यांनी एक संयुक्त निवेदन जारी करत आमंत्रण दिलं. त्यामुळे आता मालदीव आणि भारत यांच्यातील ताणावाच्या संबंधामुळे टीम इंडिया आमंत्रण स्विकारणार का? असा सवाल विचारला जातोय.
आम्हाला तुमची मेजवानी करताना खूप अभिमान वाटेल. भारतीय क्रिकेट संघाचे मालदीवमध्ये आगमन ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असेल. आम्ही सर्व खेळाडूंना होस्ट करण्याची आतुरतेनं वाट पाहत आहोत. आम्हाला आशा आहे की टीम इंडिया येथे आपला ऐतिहासिक विजय चांगला साजरा करू शकेल, असं एमएमपीआरसी आणि एमएटीआई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भारत आणि मालदीव यांच्यातील परराष्ट्रीय संबंध मध्यंतरी ताणले गेले होते. नरेंद्र मोदी यांनी लक्ष्यद्विपचा दौरा केल्यानंतर बायकॉट मालदीव असा ट्रेंड सुरू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अवमानजनक टिप्पणी करणं मालदीवला महागात पडलं होतं. भारताच्या वाकड्यात जाऊन मालदीवने चीनशी जवळीक साधली होती. त्यानंतर मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसल्याचं दिसून आलं होतं.