लसीथ मलिंगा सहा महिन्यांसाठी निलंबित

श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसीथ मलिंगाचं सहा महिन्यांसाठी निलंबन झालं आहे. 

Updated: Jun 28, 2017, 04:07 PM IST
लसीथ मलिंगा सहा महिन्यांसाठी निलंबित title=

मुंबई : श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसीथ मलिंगाचं सहा महिन्यांसाठी निलंबन झालं आहे. निलंबनाबरोबरच मलिंगाला ५० टक्के दंडही करण्यात आला आहे. सुरुवातीला मलिंगावर वर्षभराच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण आता मलिंगाला पहिल्या सहा महिन्यांमध्ये त्यानं खेळलेल्या मॅचचे प्रत्येकी ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. त्यानंतरच्या सहा महिन्यांसाठी मलिंगाचं निलंबन करण्यात येणार आहे. यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी ५ वनडे आणि एका टेस्ट मॅचसाठी मलिंगाला संधी मिळू शकणार आहे.

श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयासकेरा यांना मलिंगा माकड म्हणला होता. यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेनं महत्त्वाच्या क्षणी कॅच सोडल्यामुळे श्रीलंकेचा पराभव झाला. पराभवानंतर जयासकेरा यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंवर टीका केली होती. श्रीलंकेच्या खेळाडूंचं वजन जास्त असल्यामुळे कॅच सुटले आणि पराभव झाल्याचं जयासकेरा म्हणाले होते. खेळाडूंना लष्कराचं प्रशिक्षण देण्याची मागणीही जयासकेरांनी केली होती.  

जयासकेरा यांच्या या टीकेवर मलिंगानं प्रत्युत्तर दिलं होतं. जयासकेरा हे पोपटाच्या घरट्यात बसलेले माकड आहेत. खेळाडूंना त्यांच्या फिटनेसबद्दल माहिती आहे, असं मलिंगा म्हणाला होता. भारताविरुद्धची मॅच जिंकल्यानंतर कोणीही खेळाडूंच्या फिटनेस आणि वजनाबाबत प्रश्न विचारले नसल्याची प्रतिक्रिया मलिंगानं दिली.