५ वर्षांच्या बंदीनंतर अशरफूलला पुनरागमनाची इच्छा

बांगलादेशचा क्रिकेटपटू मोहम्मद अशरफूल यानं क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा वर्तवली आहे.

Updated: Aug 12, 2018, 07:50 PM IST
५ वर्षांच्या बंदीनंतर अशरफूलला पुनरागमनाची इच्छा title=

मीरपूर : बांगलादेशचा क्रिकेटपटू मोहम्मद अशरफूल यानं क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा वर्तवली आहे. १३ ऑगस्टला मोहम्मद अशरफूलवर घालण्यात आलेली ५ वर्षांची बंदी संपत आहे. त्याआधी अशरफूलनं पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचं स्वप्न असल्याचं बोलून दाखवलं. २०१३ सालच्या बांगलादेश प्रिमिअर लीगमध्ये अशरफूलनं मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग केलं होतं. याची कबुलीही अशरफूलनं दिली होती. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली.

अशरफूलवर सुरुवातीला ८ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. बांगलादेश बोर्डानं स्थापन केलेल्या भ्रष्टाचारविरोधी लवादानं अशरफूलवर जुलै २०१४मध्ये ही कारवाई केली होती. यानंतर एक सदस्यीय समितीनं अशरफूलवरची बंदी कमी करून ५ वर्षांची केली. तसंच शेवटच्या दोन वर्षांमध्ये अशरफूल बांगलादेशमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळू शकतो. पण त्याला ५ वर्ष आंतरराष्ट्रीय आणि बांगलादेश प्रिमिअर लीगमध्ये भाग घेता येणार नाही, असं बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं.

२०१६ पासून अशरफूल बांगलादेशमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. यादरम्यान अशरफूलनं ५ शतकं झळकावली. पण ४ आणि ५ दिवसीय क्रिकेटमध्ये अशरफूलला चमक दाखवता आली नाही.

'अशरफूलचं पुनरागमन कठीण'

दरम्यान मोहम्मद अशरफूलचं बांगलादेशच्या टीममध्ये पुनरागमन करणं कठीण असल्याचं वक्तव्य बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे अध्यक्ष मिनहाजुल अबेदिन यांनी केलं आहे. सध्या तरी अशरफूलला टीममध्ये जागा नाही. बांगलादेश टीममध्ये निवड होण्यासाठी फिटनेस आणि फॉर्म हे दोन मापदंड आहेत. यासाठी मोहम्मद अशरफूलला वेळ द्यावा लागेल. यानंतरच आम्ही अशरफूलबद्दल विचार करू शकतो. सध्या तरी अशरफूलबद्दल आम्ही विचार करत नाही, अशी प्रतिक्रिया अबेदिन यांनी दिली.