मुंबई : भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी लोकांच्या निशाण्यावर आला होता. यानंतर मोहम्मद शम्मीवर बरीच टीका झाली. पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर या गोलंदाजाला देशद्रोही म्हटले गेले होते. यानंतर मोहम्मद शमीची प्रतिक्रिया समोर आली आहे. ( Mohammed shami answer to trollers )
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या भेदक गोलंदाजीने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. या गोलंदाजाने आपली स्विंग आणि वेग याचा समन्वय असलेली गोलंदाजी सिद्ध केली. असं म्हणतात की जेव्हा एखाद्याचा दिवस वाईट असतो तेव्हा चांगल्या गोष्टीही वाईट होतात.
गोलंदाजाने जास्त धावा दिल्याने आणि विकेट न घेतल्याने ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर शमीला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. भारतीय गोलंदाजाने आता ट्रोलर्सशी बोलती बंद केली आहे.
मोहम्मद शमी म्हणतो की, 'जे ट्रोल करतात ते खरे चाहते नाहीत आणि खरे भारतीय नाहीत. मी कोणाचे प्रतिनिधित्व करतो हे मला माहीत आहे. शमी म्हणाला की, मी माझ्या देशासाठी लढतो. आम्हाला खूप आशा होत्या, पण आम्ही देखील माणूस आहोत. चुका होऊ शकतात.'
टी-20 वर्ल्ड कपदरम्यान शमीला खूप ट्रोल करण्यात आले होते. अशा वेळी विराट कोहली हा शमीच्या समर्थनात उभा राहिला होता आणि ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले होते.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध (India vs Pakistan) फॉर्ममध्ये दिसला नाही आणि गोलंदाजीत तो थोडा महागडा ठरला. यानंतर सोशल मीडियावर ट्रोलर्सनी शमीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून भारताचा दहा विकेट्सने पराभव झाला, त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी शमीला ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ट्रोल केले आणि त्याच्यावर आक्षेपार्ह कमेंट करण्यास सुरुवात केली.