Irfan Pathan On MS Dhoni: महेंद्रसिंह धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आयसीसी टी 20 आणि एकदिवसीय वर्ल्डकप विजयाचा मानाचा तुरा महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) शिरपेचात खोवला गेला आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी अजूनही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचं (CSK Captain) कर्णधारपद भूषवत आहे. धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक खेळाडूंना संधी दिली. त्याचबरोबर अनेक खेळाडूंची करिअर देखील त्याच्या संपुष्टात आल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगते. आजही काही क्रिकेट चाहते इरफान पठाणचं (Irfan Pathan) क्रिकेट करिअर महेंद्रसिंह धोनीमुळे संपुष्टात आल्याचं बोलतात. असंच एक ट्वीट सध्या चर्चेत आहे. इरफानने डिसेंबर 2003 मध्ये टेस्ट मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
एका क्रिकेट चाहत्याने पठाणबद्दल ट्विट करत लिहिले आहे की, 'जेव्हा मी इरफान पठाणला या लीगमध्ये पाहतो तेव्हा मी एमएस धोनी आणि व्यवस्थापनाला कोसतो. इरफानने वयाच्या 29 व्या वर्षी मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये शेवटचा सामना खेळला यावर विश्वास बसत नाही. हे मनाला पटत नाही. कोणताही संघ इरफान पठाणला सातव्या क्रमांकावर घेण्यास उत्सुक असेल, पण भारताने त्याच्यापेक्षा रवींद्र जडेजा आणि अगदी बिन्नी (स्टुअर्ट) यांना संधी दिली.'
इरफान पठाणची नजर या ट्वीटवर पडताच त्याने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. पठाणनं प्रत्युत्तरात लिहिलं की, 'कोणालाही याबाबत जबाबदार धरू नका. तुमच्या दर्शवलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद'.
Don’t blame any one. Thank you for love
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 27, 2022
इरफान पठाणनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 29 टेस्ट, 120 वनडे आणि 24 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. टेस्टमध्ये त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतकं झळकावत 1105 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात पाच अर्धशतकांसह 1544 धावा केल्या आहेत. इरफान पठाणनं टेस्टमध्ये 100 आणि वनडेमध्ये 173 गडी बाद केले आहेत. T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये त्याने 172 धावा केल्या आणि एकूण 28 विकेट घेतल्या आहेत.