close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार?

महेंद्रसिंह धोनी माझा मित्र आहे. बऱ्याच काळापासून त्याच्या भाजप प्रवेशाविषयी पक्षातंर्गत चर्चा सुरु आहे.

Updated: Jul 12, 2019, 11:19 PM IST
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार?

नवी दिल्ली: भारतीय संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवणारा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सध्या क्रिकेटविश्वात सुरु आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत धोनीला त्याच्या फिनिशर या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून धोनीच्या बॅटमधील धावांचा ओघ आटला आहे. त्यामुळे धोनी लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल, अशी दाट शक्यता आहे. 

यानंतर महेंद्रसिंह धोनी राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. धोनी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करेल, असे राजकारणातील सूत्रांकडून सांगितले जात आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते संजय पासवान यांनी यासंदर्भात आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, महेंद्रसिंह धोनी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. बऱ्याच काळापासून याविषयी पक्षात चर्चा सुरु आहे. मात्र, महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय होईल, असे पासवान यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा यांनी सुरु केलेल्या 'संपर्क फॉर समर्थन' या अभियानासाठी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निवड केलेल्या सेलिब्रेटींमध्ये धोनीचाही समावेश होता. 

धोनीचे जन्मस्थान असलेल्या झारखंडमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्र म्हणून ऐनवेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून महेंद्रसिंह धोनीचे नाव पुढे केले जाऊ शकते. त्यामुळे आता माही राजकारणात प्रवेश करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.