३००व्या वनडेमध्ये धोनी हे दोन रेकॉर्ड मोडणार?

श्रीलंकेविरुद्धची चौथी वनडे खेळण्यासाठी महेंद्रसिंग धोनी गुरुवारी मैदानात उतरणार आहे. 

Updated: Aug 30, 2017, 09:34 PM IST
३००व्या वनडेमध्ये धोनी हे दोन रेकॉर्ड मोडणार? title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धची चौथी वनडे खेळण्यासाठी महेंद्रसिंग धोनी गुरुवारी मैदानात उतरणार आहे. वनडे कारकिर्दीमधली धोनीची ही ३००वी वनडे असणार आहे. भारताकडून ३०० पेक्षा जास्त वनडे खेळणारा धोनी हा सहावा खेळाडू बनणार आहे.

भारताकडून सचिन तेंडुलकर(४६३), राहुल द्रविड(३४४), मोहम्मद अजहरुद्दीन(३३४), सौरव गांगुली (३११) आणि युवराज सिंग (३०४) वनडे खेळले आहेत. या रेकॉर्डबरोबरच धोनीला आणखी दोन विश्वविक्रम करण्याची संधी आहे.

वनडे क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर ९९ स्टम्पिंग आहेत. उद्याच्या मॅचमध्ये धोनीनं एक स्टम्पिंग घेतला तर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करणारा विकेट कीपर ठरेल तसंच त्याची स्टम्पिंगची सेंच्युरीही पूर्ण होईल. सध्या श्रीलंकेच्या कुमार संगकाराचेही वनडे क्रिकेटमध्ये ९९ स्टम्पिंग आहेत.

याचबरोबर धोनी वनडे क्रिकेटमध्ये ७२ वेळा नॉट आऊट राहिला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नॉट आऊट राहण्याच्या बाबतीत धोनी, चामुंडा वास आणि शेन पोलॉकची बरोबरी आहे.