न्यूझीलंडच्या कॉलीन मुन्रोनं मोडला युवराजचा विक्रम

न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20मध्ये इंग्लंडनं न्यूझीलंडला २ रन्सनी हरवलं आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 18, 2018, 05:19 PM IST
न्यूझीलंडच्या कॉलीन मुन्रोनं मोडला युवराजचा विक्रम title=

हॅमिल्टन : न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये झालेल्या टी-20मध्ये इंग्लंडनं न्यूझीलंडला २ रन्सनी हरवलं आहे. पण या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या कॉलीन मुन्रोनं युवराज सिंगच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. कॉलीन मुन्रोनं टी-20मध्ये २० किंवा त्यापेक्षा कमी बॉल्समध्ये तीनवेळा अर्धशतकं झळकवली आहेत. याआधी हे रेकॉर्ड युवराज सिंगच्या नावावर होतं.

युवराज सिंगनं १२, २० आणि पुन्हा २० बॉल्समध्ये टी-20 मॅचमध्ये अर्धशतकं केली होती. तर मुन्रोनं १४, १८ आणि १८ बॉल्समध्ये अर्धशतकं केली आहेत. युवराज सिंगपेक्षा कमी बॉल्स लागल्यामुळे या यादीमध्ये मुन्रो आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसंच त्यानं युवराजला मागे टाकत विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे. याआधी कॉलीन मुन्रोनं २०१६ साली श्रीलंकेविरुद्ध १४ बॉल्समध्ये, २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध १८ बॉल्समध्ये अर्धशतकं झळकावली होती. 

इंग्लंडविरुद्धच्या या मॅचमध्ये मुन्रोनं १८ बॉल्समध्ये ५० रन्सची वादळी खेळी केली. २१ बॉल्समध्ये ५७ रन्स करुन मुन्रो आऊट झाला. २७१.४३ च्या स्ट्राईक रेटनं केलेल्या या खेळीमध्ये मुन्रोनं ७ सिक्स आणि ३ फोर लगावले. मुन्रोच्या या खेळीनंतरही न्यूझीलंडला ही मॅच २ रन्सनी गमवावी लागली.

या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.  इयॉन मॉर्गने शानदार ८० रन्सची इनिंग खेळली त्यामुळे इंग्लंडच्या टीमने २० ओव्हर्समध्ये १९४ रन्स पर्यंत मजल मारली. यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या टीमने चांगली सुरुवात केली. मात्र, २० ओव्हर्समध्ये त्यांना १९२ रन्सपर्यंतच मजल मारता आली आणि त्यामुळे इंग्लंडने ही मॅच २ रन्सने जिंकली.

तीन देशांच्या टी-२० सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा अवघ्या २ रन्सने पराभव केला. मात्र, असं असलं तरी न्यूझीलंडची टीम फायनलमध्ये दाखल झाली आहे. न्यूझीलंडच्या टीमला १७५ रन्सवर रोखलं असतं तर इंग्लंडची टीम फायनलमध्ये पोहोचली असती. मात्र, तसं झालं नाही. न्यूझीलंडच्या टीमने २० ओव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावत १९२ रन्स केले आणि फायनलमध्ये धडक मारली आहे.