मुंबई : न्यूझीलंडची क्रिकेट टीम ही त्यांच्या मैदानातल्या चांगल्या वर्तणुकीमुळे कायमच चर्चेत असते. न्यूझीलंडच्या अंडर-१९ खेळाडूंनीही याचाच कित्ता गिरवला आहे. अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडच्या टीमने माणुसकीचं दर्शन घडवून आणलं आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या अंडर-१९ वर्ल्ड कप सुरु आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंनी चक्क प्रतिस्पर्धी खेळाडूला उचलून घेतलं.
४३व्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना किर्क मॅकेन्झीच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे मॅकेन्झीला चालताही येत नव्हतं, त्यामुळे मॅकेन्झी मैदानाबाहेर गेला. पण वेस्ट इंडिजची नववी विकेट गेल्यानंतर मॅकेन्झी पुन्हा एकदा बॅटिंगला आला. ९९ रनवर आऊट झाल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मॅकेन्झीला खांद्यावर घेतलं आणि त्याला ड्रेसिंग रुममध्ये घेऊन गेले.
वर्ल्ड कपच्या या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर वेस्ट इंडिजचा ४७.५ ओव्हरमध्ये २३८ रनवर ऑल आऊट झाला. किर्क मॅकेन्झीने १०४ बॉलमध्ये ९९ रनची खेळी केली.
वेस्ट इंडिजने ठेवलेल्या २३९ रनच्या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने यशस्वी रित्या केला. या मॅचमध्ये न्यूझीलंडचा २ विकेटने विजय झाला. जो फिल्ड आणि क्रिस्टियन क्लार्क यांच्यामध्ये नवव्या विकेटसाठी नाबाद ८६ रनची पार्टनरशीप झाली. न्यूझीलंडची अवस्था १५३/८ अशी झाली होती, पण फिल्ड आणि क्लार्क यांनी संघर्ष करुन न्यूझीलंडचा विजय खेचून आणला.