हेमिल्टन : ऑस्ट्रेलिया दौरा जिंकल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. २३ जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून पाच एकदिवसीय सामन्यातील पहिला सामना नेपिअर येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाची न्यूझीलंडमधील आतापर्यंतची कामगिरी फारशी चमकदार राहिली नाही. परंतु, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरोधात ऑस्ट्रेलियातच ऐतिहासिक कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्याने संघाच्या विश्वासात वाढ झाली आहे. त्यामुळे यावेळेस न्यूझीलंडला भारताचे कडवे आव्हान असणार आहे.
भारताने आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्ध सात एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंड विरोधात आतापर्यंत एकूण ३४ सामने खेळले आहेत. या ३४ सामन्यांपैकी २१ सामन्यांमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाने १० सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे तर दोन सामने रद्द झालेत.
भारताने आतापर्यंत नेपिअर मैदानात न्यूझीलंड विरुद्ध ६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या ६ सामन्यांपैकी भारताला फक्त २ तर न्यूझीलंडला ४ सामने जिंकता आले आहेत. भारतीय संघाने या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात नाणेफेक जिकंली आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणारा संघ ४ वेळा जिंकला आहे. भारतीय संघाने नेपिअर मैदानात आतापर्यंत जिंकलेल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात प्रथम फलंदाजी आणि दुसऱ्या सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी केली आहे.
याआधी न्यूझीलंड आणि भारतीय संघात अखेरचा सामना हा १९ जानेवारी २०१४ साली झाला होता. या सामन्यामध्ये नाणेफक जिंकून कर्णधार धोनीने क्षेत्ररक्षण निवडले होते. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या केन विल्यमसन, रॉस टेलर आणि कोरी एंडरसन या तिघांनी अर्धशतकी खेळी केली होती. या तिंघानी अनुक्रमे ७१, ५५, ६८ धावा केल्या. यांच्या खेळीमुळे भारताला विजयासाठी २९३ धावांचे आव्हान मिळाले. तर भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने १२३ धावांची शतकी कामगिरी केली. पण त्याला भारताला विजय मिळवून देता आला नाही. विराट कोहली व्यतिरिक्त या सामन्यात शिखर धवनने ३२ तर महेंद्रसिंह धोनीने ४० धावा केल्या. भारताचा डाव ४९ व्या षटकात २६८ धावांवर आटोपला.
न्यूझीलंड विरुद्धात २०१४ ला झालेल्या अखेरच्या मालिकेतील भारतीय संघ आणि आताचा भारतीय संघ यात खूप फरक आहे. भारतीय संघाची गोलंदाजी ही आातापर्यंत कमजोर होती. परंतु, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय गोलंदाजांना सूर गवसला आहे. त्यामुळे भारतीय संघाची गोलंदाजी जमेची बाजू झाली आहे. त्यामुळे न्यूझीलंडला आतापर्यंतच्या उत्तम भारतीय गोलंदांजीचा सामना करावा लागणार आहे.