'द्रविडकडून हितसंबंधांचं उल्लंघन नाही'; बीसीसीआयचं स्पष्टीकरण

राहुल द्रविडनं हितसंबंधांच्या मुद्द्याचं उल्लंघन केलं नसल्याचं बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं स्पष्ट केलं आहे.

Updated: Aug 14, 2019, 09:16 PM IST
'द्रविडकडून हितसंबंधांचं उल्लंघन नाही'; बीसीसीआयचं स्पष्टीकरण title=

मुंबई : राहुल द्रविडनं हितसंबंधांच्या मुद्द्याचं उल्लंघन केलं नसल्याचं बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं स्पष्ट केलं आहे. आता चेंडू बीसीसीआयचे लोकपाल आणि नैतिक अधिकारी, जैन यांच्या कोर्टात असल्याचंही समितीनं म्हटलं आहे. द्रविड हा आयपीएलचा संघ चेन्नई संघाची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट कंपनीचा कर्मचारी आहे. यानंतर द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यानं हितसंबंधांच्या मुद्द्याचं उल्लंघन केल्याची तक्रार लोकपालकडे दाखल करण्यात आली.

राहुल द्रविड याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)च्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. ही निवड होत असतानाच द्रविड इंडिया सिमेंट्सचा उपाध्यक्षही आहे. या कंपनीकडे आयपीएलच्या चेन्नई सुपरकिंग्सच्या टीमचे मालकी हक्कही आहे. हे परस्पर हितसंबंधाचं प्रकरण असल्याचा आरोप मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केला. याबाबत संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांच्याकडे तक्रार केली.

या तक्रारीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली चांगलाच भडकला होता.  'भारतीय क्रिकेटमध्ये नवीन फॅशन आली आहे. परस्पर हितसंबंध... बातम्यांमध्ये राहण्याची सगळ्यात योग्य पद्धत. देवानेच भारतीय क्रिकेटची मदत करावी,' असं ट्विट गांगुलीने केलं.

याआधी संजीव गुप्ता यांनीच परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यावरून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याविरोधात हितसंबंधांच्या मुद्द्यावरून लोकपालकडे तक्रार दाखल केली होती. १६ ऑगस्टपर्यंत द्रविडला या नोटीसला उत्तर द्यावं लागणार आहे.