VIDEO: पाकिस्तानच्या हसन अलीचा 'रडीचा डाव', पाहा मैदानात काय केलं

३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम तिकडे पोहोचली आहे.

Updated: Apr 29, 2019, 10:25 PM IST
VIDEO: पाकिस्तानच्या हसन अलीचा 'रडीचा डाव', पाहा मैदानात काय केलं title=

मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची टीम तिकडे पोहोचली आहे. पाकिस्तानने इंग्लंडमध्ये स्थानिक टीमसोबत मॅच खेळायलाही सुरुवात केली आहे. २८ एप्रिलला पाकिस्तानने केंटविरुद्धच्या मॅचमध्ये १०० रननी विजय मिळवला. पण या मॅचमध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन अलीचा रडीचा डाव पाहायला मिळाला. यामुळे पाकिस्तानच्या टीमला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल करण्यात येत आहे.

हसन अलीच्या बॉलिंगवर केंटचा बॅट्समन ऍलेक्स ब्लॅकने शॉट मारला. ब्लॅकच्या बॅटच्या एजला लागलेला बॉल हवेत गेला, त्यामुळे हसन अलीने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पण बॉल हसन अलीच्या हातात आला नाही. बॉल जमिनीवर पडला असला तरी हसन अलीने कॅच पकडल्याच्या आवेशात जल्लोषाला सुरुवात केली, पण व्हिडिओमध्ये मात्र हसन अलीचा खोटारडेपणा समोर आला.

हसन अलीने कॅच पकडल्याचं वाटल्यामुळे ऍलेक्स ब्लॅकही मैदान सोडून जाऊ लागला. पण त्याचा साथीदार ओली रॉबिनसनने कॅच सोडल्याचा दावा केला आणि अंपायरकडे तक्रार केली. पण या मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये असतो तसा थर्ड अंपायर नव्हता, यामुळे ब्लॅकला आऊट देण्यात आलं. या मॅचमध्ये ब्लॅक ८९ रन करून आऊट झाला.

हसन अलीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हसन अलीने कॅच पकडला नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. केंटविरुद्धच्या या मॅचमध्ये पाकिस्तानने ३५८ रन केले होते. याचा पाठलाग करताना केंटची टीम २५८ रनवर ऑलआऊट झाली.