Weather Update: गेल्या काही दिवसांपासून पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांना उकाड्यापासून आराम मिळाला आहे. यावेळी मान्सून सक्रिय होण्याची चिन्हं दिसून येतायत. कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाने मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यावेळी कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश व मधूनमधून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असून दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. तसंच पश्चिम घाटाच्या परिसरात पुणे आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
येत्या काही दिवसामध्ये उत्तर अरबी समुद्र, मध्य प्रदेश आणि आग्नेय राजस्थानच्या अतिरिक्त प्रदेशांमध्येही मान्सूनचा अधिक जोर दिसून येण्याची शक्यता आहे. पुढील 4-5 दिवसांत पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत आणि ईशान्य भारतामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई-ठाणे परिसरात उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, किनाऱ्याजवळ काम करणाऱ्याना सावध राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांत रविवारपर्यंत मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यांत गुरुवारपासून आठवडाभर म्हणजे 4 जुलैपर्यंत अरबी समुद्र शाखीय म्हणजे डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या डांगी पावसाची जोरदार शक्यता आहे.