'कोहलीला संघातून बाहेर काढ'; संघाच्या मॅनेजरचा आदेश ऐकताच धोनी म्हणाला, 'एक काम करा माझं...'; पाकिस्तानच्या खेळाडूचा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात नेहमीच खास नातं राहिलं आहे. महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) कर्णधार असताना नेहमीच विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. दरम्यान पाकिस्तानच्या माजी खेळाडूने एक किस्सा सांगितला जेव्हा धोनीने विराटला संघातून वगळण्यापासून वाचवलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Jul 3, 2024, 03:30 PM IST
'कोहलीला संघातून बाहेर काढ'; संघाच्या मॅनेजरचा आदेश ऐकताच धोनी म्हणाला, 'एक काम करा माझं...'; पाकिस्तानच्या खेळाडूचा खुलासा title=

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) खास कमगिरी करु शकला नाही. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये संघर्ष करणाऱ्या विराट कोहलीने अंतिम सामन्यात मात्र आपली चमक दाखवली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. विराट कोहली वर्ल्डकपमध्ये अपयशी ठरत असताना काहीजण त्याला संघातून वगळून यशस्वी जैस्वावला संधी द्यावी अशी मागणी करत होते. दरम्यान विराट कोहली भारतीय संघात संघर्ष करत असताना पाकिस्तानचा माजी खेळाडू उमर अकमलने 2012-13 दरम्यानचा एका किस्सा सांगितला जेव्हा महेंद्रसिंग धोनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. विराट कोहली तेव्हाही आपल्या खराब फॉर्मशी झुंज देत होता. 

उमर अकमलने सांगितला 2012-13 चा किस्सा

पाकिस्तानच्या जिओ न्यूज चॅनेलचा शो 'हारना मना है' वर बोलताना उमरान अकमलने संघाच्या भारत दौऱ्यातील एक किस्सा सांगितला होता. "ही 2012-13 ची गोष्ट आहे. मी महेंद्रसिंग धोनीसह डिनर करत होतो. सुरेश रैना, युवराज सिंग आणि शोएब मलिकही तिथे उपस्थित होता. विराट कोहली तेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. त्यावेळी भारतीय संघाचा मॅनेजर महेंद्रसिंग धोनीकडे आला आणि विराट कोहलीला संघातून बाहेर काढण्यास सांगितलं. त्यावर धोनीने उत्तर दिलं की, मीदेखील सहा महिन्यांपासून घरी गेलेलो नाही. तुम्ही विराट कोहलीसह माझं तिकीटही बूक का करत नाही? त्यावर मॅनेजरने धोनीला त्याला हव्या त्या खेळाडूंना खेळवण्याची परवानगी दिली".

विराट कोहलीला संघातून बाहेर करण्याच्या प्रश्नावर धोनीने दिलेल्या उत्तराने उमरान अकमल आश्चर्यचकित झाला होता. उमरान अकमलने पुढे सांगितलं की, मी धोनीला तू असं उत्तर का दिलंस असं विचारल. त्यावर धोनीने त्याला सांगितलं होतं की, "विराट आमचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. जर तो 3 ते 4 सामन्यात अयशस्वी झाला असेल तर त्याला का सोडून द्यावं?".

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील मैत्री मैदान आणि मैदानाबाहेर नेहमीच दिसली आहे. अनेकदा त्यांनी आपल्या मैत्रीबद्दल जाहीरपणे सांगितलंही आहे. या घटनेनंतर 2 वर्षांनी महेंद्रसिंग धोनीने विराट कोहलीकडे कर्णधार सोपवलं होतं. विराट कोहलीने आपल्या करिअरदरम्यान एकदिवसीय वर्ल्डकप, चॅपियन्स ट्रॉफी, टी-20 वर्ल्डकप जिंकले आहेत. भारताने यावर्षी टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केली आहे.