Pakistan vs Netherlands Babar Azam Wicket: वर्ल्डकप 2023 मधील दुसरा सामना आज पाकिस्तान आणि नेदरलँडदरम्यान खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानी संघाची सुरुवात फारच अडखळत झाली आहे. विशेष म्हणजे सराव सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणारा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अगदीच स्वस्तात तंबूत परतला आहे. लिंबू-टिंबू संघांकडून अनपेक्षितपणे पराभूत होण्याचा नकोसा इतिहास नावावर असलेल्या पाकिस्तानची अवस्था पाहून संघाबरोबरच बाबार आझमलाही ट्रोल केलं जात आहे.
हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि नेदरलँडदरम्यान वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून नेदरलँडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सामन्यातील चौथ्याच ओव्हरला योग्य ठरला. पाकिस्तानचा सलामीवीर फकर झमान हा संघाची धावसंख्या 15 वर असताना 15 चेंडूंमध्ये 12 धावा करुन बाद झाला. लोगन व्हॅन बिकने फकर झमानला कॉट अॅण्ड बोल्ड केलं. त्यानंतर फलंदाजीसाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आला.
आयसीसीच्या पूर्णवेळ संघांमध्ये नसलेल्या नेदरलँडविरुद्ध पाकिस्तानचा कर्णधार भरपूर धावा करेल अशी अपेक्षा होती. मात्र सामन्यातील 9 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर बाबर बाद झाला. बाबर अवघ्या 5 धावा करुन तंबूत परतला. त्याने या पाचही धावा धावून काढल्या. बाबरला या खेळीत एकही चौकार मारता आला नाही. 5 धावा काढण्यासाठी बाबर 18 चेंडू खेळला. बाबरला कॉलीन अक्रमने साकीब जुल्फीकारकरवी झेलबाद केलं. बाबर बाद झाला तेव्हा पाकिस्तानचा स्कोअर 34 वर होता. बाबरच्या या 18 बॉलच्या खेळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
बाबर लवकर बाद होण्याचं आश्चर्य वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे मुख्य मालिका सुरु होण्याआधीच्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये बाबरने उत्तम फलंदाजी केली होती. बाबर आझमने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये 59 चेंडूंमध्ये 90 धावा केल्या होत्या. त्यानंतर बाबर रिटायर हर्ट झाला होता. पाकिस्तानचा संघ 83 वर 4 बाद स्थितीत असताना बाबरने ही खेळी केल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. बाबरने न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये 80 धावांची खेळी केली होती. या दोन्ही खेळींमुळेच बाबर या वर्ल्डकपमध्ये उत्तम कामगिरी करेल असं मानलं जात होतं. मात्र पहिल्या सामन्यावर फलंदाजीत तरी त्याला छाप पाडता आलेली नाही. तुम्हीच पाहा बाबरची ही खेळी...
Lumber 1 Batter Babar Azam’s 5(18) vs NED
(Ball by ball highlights)#CWC23 | #WorldCup | #PAKvsNED | pic.twitter.com/gippTefd9y
— (@balltamperrerrr) October 6, 2023
विशेष म्हणजे बाबर बाद झाल्यानंतर 4 चेंडूंनंतर पाकिस्तानी संघाची धावसंख्या 38 वर असताना उमाम-उल-हक तंबूत परतला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था 38 वर चार अशी झाली.