'अजूनही माझ्या हृदयाचे...' ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेची पहिली प्रतिक्रिया

Paris Olympic 2024 :  मराठमोळ्या स्वप्निल कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. 50 मीटर प्रोन प्रकारात स्वप्निलने पदक जिंकल. पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे.

राजीव कासले | Updated: Aug 1, 2024, 02:58 PM IST
'अजूनही माझ्या हृदयाचे...' ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेची पहिली प्रतिक्रिया title=

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसळेने (Swapnil Kusale) इतिहास रचलाय. तब्बल 72 वर्षांनी स्वप्निल कुसळेने महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलंय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये  (Paris Olympic 2024) महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळेनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलंय. या स्पर्धेत स्वप्नीलनं एकूण 451.4 गुण मिळवले. भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं मेडल आहे. स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूरमधल्या कांबळवाडी गावातील आहे. स्वप्निल कुसाळे 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावलंय.

पदक जिंकल्यानंतर स्वप्निलची पहिली प्रतिक्रिया
पदक मिळवल्यानंतर स्वप्निलने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पदक जिंकल्यानंतर स्वप्निल म्हणाला, 'खूप आनंद झाला आहे. अजूनही माझ्या हृदयाचे ठोके वाढलेले जाणवतायत. एलिमिनेशन राऊंडमध्ये मी फक्त माझ्या श्वासावर लक्ष केंदित केलं होतं. स्कोरचा विचार मी अजिबात विचार करत नव्हतो. जे इतके वर्ष करत होतो तेच यावेळीही फॅालो केलं. भारतासाठी मेडल जिंकल्याचा आनंद जास्त आहे'

स्वप्निलचा ऑलिम्पिक प्रवास
स्वप्निल कुसळेने इजिप्तमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत चौथं स्थान मिळवत ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती. त्यानंतर 2024 मध्ये त्याने ट्रायल्समधून पॅरिस ऑलिम्पिकचं तिकिट निश्चित केलं. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा हा स्वप्निलचा प्रेरणास्थान आहे. 2008 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्वप्निल त्याच्यापासून प्रेरित झाला. विशेष म्हणजे बिंद्राचा सामना पाहाण्यासाठी स्वप्निलने बारावीचा पेपरही बुडवला होता.

सुवर्ण पदक विजेत्या अभिनव ब्रिंद्रांकडून कौतुक
अथेन्स ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रानेही स्वप्नीलचं कौतुक केलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलनं नेमबाजीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल खूप आनंद झाल्याचं अभिवन बिंद्रानं म्हटलंय. तुझी जिद्द, मेहनत खऱ्या अर्थानं फळाला आल्याचंही बिंद्रा म्हणालाय. सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करणं आणि नेमबाजीत पदक मिळवणं हे तुमच्या समर्पणाचा आणि प्रतिभेचा दाखला आहे. भारताला तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही दाखवून दिलं की स्वप्नांचा पाठलाग करणं म्हणजे काय असंत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 ही एक अविस्मरणीय घटना आहे..आणखी विजय मिळवायचे आहेत. चमकत राहा. अशा शब्दांत अभिनव बिंद्रानं स्वप्नीलचं कौतुकं केलंय. 

भारताला आतापर्यंत तीन मेडल
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आत्तापर्यंत तीन पदकं मिळाली. मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि आज स्वप्निल कुसाळे यांनी कांस्य पदक पटकावलं आहे.