मंद, माकड म्हणून हिणवलं, आता पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत रचला इतिहास... कोण आहे दीप्ती?

Paralympic 2025 : भारताची पॅरी अॅथलिट दीप्ती जीवनजी हिने पॅरिसमधल्या पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. दीप्तीने महिलांच्या 400 मीटर टी0 प्रकारात कांस्य पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी दीप्ती ही भारताची पहिली अॅथलिट ठरली आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 4, 2024, 05:47 PM IST
मंद, माकड म्हणून हिणवलं, आता पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत रचला इतिहास... कोण आहे दीप्ती? title=

Paralympic 2024 : पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 मध्ये सहावा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. 3 सप्टेंबरला भारतीय खेळाडू्ंनी तब्बल पाच पदकं जिंकत टोकियो ऑलिम्पिकचा विक्रम मागे टाकला. भारताने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत 21 पदकं जिंकली आहेत. पॅरालिम्पिक इतिहासातील भारताची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीत तेलंगणाच्या दीप्ती जीवनजी (Deepthi Jeevanji) हिने मोलाची भूमिका बजावली आहे. दीप्तीने महिलांच्या  400 मीटर टी0 प्रकारात कांस्य पदक पटकावलं.  हा प्रकार मानसिकदृष्ट्या अपंग खेळाडूंसाठी राखीव आहे. अशी कामगिरी करणारी दीप्ती ही भारताची पहिली अॅथलिट ठरली आहे. 20 वर्षांच्या दीप्तीने 55.82 सेकंदात रेस पूर्ण केली. अवघ्या 0.66 सेकंदाने तिचं पहिलं स्थान हुकलं.

दीप्तीचा प्रेरणादायी प्रवास
दीप्तीचा ऑलिम्पिक पदकापर्यंतचा हा प्रवास प्रचंड खडतर ठरलाय. दीप्ती ही मूळची आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) वारंगल जिल्ह्यातील कलेदा गावातील आहे. दीप्ती जन्मत:च मानसिकदृष्ट्या अपंग होती. आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी तिला केवळ आपल्या मानसिक आजाराशीच नव्हे तर समाजाशीही लढावं लागलं.

दीप्ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने तिला बोलण्यास किंवा काम करताना अडथळा येत होता. दीप्तीचं डोकं छोटं होतं, ओठ आणि नाक सामान्य मुलांपेक्षा तोडं वेगळं असल्याने तिला गावातील लोकं इतकंच काय तर नातेवाईकही टोमणे मारायचे. 'आमचे अनेक नातेवाईक आणि गावकरी दिप्तीला मंद आणि माकड म्हणायचे, तिला अनाथ आश्रमात सोडून या', असा सल्लाही द्यायचे. आज तिचं हे यश पाहून दीप्ती खरोखरचं एक स्पेशल मुलगी आहे,असं वाटतं, अशी प्रतिक्रिया दीप्तीच्या आईने दिली आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा असल्याची दीप्तीची आई धनलक्ष्मी जीवनजी हिने म्हटलं आहे. 

संघर्षमय आयु्ष्य
दीप्तीची आई धनलक्ष्मी यांनी आपली आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असल्याचं सांगितलं. दीप्तीच्या आजोबांच्या मृत्यूनंतर शेत जमीन विकावी लागली. दीप्तीचे वडिल मोलमजुरी करायचे यातून दिवसाला 100 ते 150 रुपये कमाई व्हायची. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला दोन वेळचं जेवणही मिळवणं मुश्किल होतं. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दीप्तीच्या आईनेही मोलमजुरीची कामं सुरु केली. दीप्ती लहानपणापासून शांत स्वभावाची होती. गावातील मुलं तिला तिच्या दिसण्यावरुन चिडवायची. त्यावेळी ती घरी येऊन खूप रडायची अशी माहिती दीप्तीच्या आईने दिली.

पॅरालिम्पिकपर्यंतचा प्रवास?
दीप्ती लहानपणापासूनच खेळात हुशार होती. 15 वर्षांची असताना स्पोर्ट्स ऑथोरेटी ऑफ इंडियाचे प्रशिक्षक एन रमेश यांची नजर तिच्यावर पडली. तिच्यातलं टॅलेंट त्यांनी ओळखलं आणि त्यांनी दीप्लीला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. एन रमेश यांच्या मेहनतीला अखेर यश आलं. दीप्तीने 2022 एशियन पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत तीने एशियन विक्रमही मागे टाकला. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्समध्येही दीप्तीने चॅम्पियनचा खिताब पटकावला. आता पॅरिक पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावत दीप्तीने इतिहास रचलाय.