मुंबई : उत्तर प्रदेश पोलीसमधील सब इंन्सपेक्टरचा मुलगा लखपती झाला आहे. तो आयपीएलमध्ये खेळणार आहे.
मुराबादच्या मोहसिन खानची आयपीएलमध्ये निवड झाली आहे. मुंबई इंडियन्सने त्याला दुसऱ्या दिवसाच्या लिलावात विकत घेतलं. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपये मोजले आहेत. यानंतर मोहसिन खानच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. जेव्हा लिलाव सुरु होता तेव्हा तो मुरादाबादमध्ये होता. सध्या तो टीएमयूमध्ये अभ्यास करतो आहे.
भारताचा जलद गोंलदाज भुवनेश्वर कुमारचे वडील देखील उत्तर प्रदेश पोलीसमध्ये सबइंन्सपेक्टर होते. मोहसिनचे वडील सध्या बंदायूमध्ये तैनात आहेत. मोहसिनला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. त्याच्या वडिलांना त्याला यासाठी प्रेरित केलं. सुरुवातीला नातेवाईकांनी त्याला विरोध केला पण नंतर त्याच्या क्रिकेटच्या पॅशनपुढे सर्वच पराभूत झाले.
शमी आणि पीयूष चावला नंतर मोहसिन आता मुरादाबाद मधून येणारा तिसरा खेळाडू आहे. जहीर खानला मोहसिन आदर्श मानतो. त्याची निवड झाल्यानंतर त्याच्या घरी लोकांनी गर्दी केली. याआधी मोहसिनने अंडर 16 मध्ये देखील जागा बनवली होती. त्यानंतर यूपी अंडर 19 मध्ये देखील तो खेळला आहे. रणजीमध्ये त्याला संधी नाही मिळाली. मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याला वनडेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मोहसिन खान 140 किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करतो.