राजस्थान रॉयल्सही स्टीव्ह स्मिथला धक्का देणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला आहे.

Updated: Mar 25, 2018, 05:48 PM IST
राजस्थान रॉयल्सही स्टीव्ह स्मिथला धक्का देणार title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला आहे. यानंतर स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सची टीमही स्मिथला डच्चू द्यायच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्सची टीम लवकरच याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करु शकते. स्टीव्ह स्मिथऐवजी अजिंक्य रहाणेकडे टीमचं नेतृत्व जाऊ शकतं.

बॉलशी छेडछाड नडली

केपटाऊन कसोटीत बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथची कर्णधारपदारवरुन हकालपट्टी करण्यात आलीय. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही कारवाई केली. त्याच्याऐवजी आता टीम पेनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आलीय. केपटाऊन कसोटीत बॉल कुरतडल्याची बाब स्मिथनं कबुल केली. आता केपटाऊन टेस्टसाठी उर्वरित दोन दिवस स्मिथ कॅप्टन्सी करु शकणार नाही.

स्मिथची कबुली

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. पाचवेळच्या जगज्जेत्या संघानं कसोटी सामना जिंकण्यासाठी चेंडूशी छेडछाड करणं ही निश्चितच शर्मेंची बाब आहे. तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं.

अशी झाली बॉलशी छेडछाड

दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करताना दिसला. चेंडूला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून चेंडूला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे चेंडू खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं. बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या चेंडूशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.

क्रिकेटची प्रतिमा झाली मलिन

ऑस्ट्रेलियन संघ नेहमीच सामना जिंकण्यासाठी स्लेजिंगचा वापर करत प्रतिस्पर्धी संघावर दबावतंत्र टाकायचा. आणि आातातर चेंडू कुरतडण्यापर्यंत या संघाची मजल गेलीय. यामुळे क्रिकेटविश्वात त्यांची प्रतिमा आणखी मलिन झालीय. सभ्य गृहस्थांचा खेळ अशी क्रिकेटशी ओळख. मात्र हा सभ्य गृहस्थांचा खेळ राहिलाय का असाच प्रश्न निर्माण झालाय. तसंच क्रिकेटमधील संघभावना यावरही सवाल उपस्थित झालाय.