मुंबई : क्रिकेटपटूंची एक संपूर्ण पिढी घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यांच्याबद्दलच्या आठवणींना भारताचे माजी खेळाडू आणि विदर्भ टीमचे प्रशिक्षक चंद्रकात पंडित यांनी उजाळा दिला आहे.
चंद्रकांत पंडित जेव्हा प्रशिक्षक म्हणून नव्याने सुरुवात करत होते, तेव्हा ते रमांकात आचरेकर यांचा आशिर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी आचरेकर सर पंडित यांना म्हणाले की, क्रिकेट प्रशिक्षणात माझ्यानंतर तुच आहेस, या शब्दात आचरेकर सरांना पंडित यांची स्तुती केली होती. आज ही बाब पंडित अभिमानाने मिरवतात.
चंद्रकांत पंडित यांनी क्रिकेट मधील बाराखडी आचरेकर सरांच्या मार्गदर्शनात गिरवली. त्यामुळे पंडित यांच्यावर आचरेकरांचा प्रभाव पाहायला मिळतो. ज्या प्रकारे आचरेकर सर आपल्या शिष्यांना क्रिकेटचे धडे द्यायचे, तीच पद्धत पंडित आत्मसात करत आहेत. त्याच पद्धतीने ते आपल्या शिष्यांना क्रिकेट शिकवतात. आचरेकरांना ज्या प्रकारे क्रिकेट शिकवताना पंडित यांनी पाहिलंय, त्याच प्रकारे आता पंडीत आपल्या शिष्यांना शिकवत आहेत.
'सरांमध्ये असलेले गुण माझ्यात उतरले आहेत. आचरेकर सर प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवायचे. तसेच मी देखील करतो. सरावादरम्यान आमच्याकडून होणाऱ्या चूका ते बस तिकीटाच्या मागे लिहून ठेवायचे. मी यासर्व गोष्टी डायरीत किंवा कधी कॉम्प्यूटर मध्ये लिहून ठेवतो', असं चंद्रकांत पंडित म्हणाले.
'जेव्हा मी पहिल्यांदा १९ वर्षांखालील मुंबई टीमचा प्रशिक्षक झालो, तेव्हा मी आशीर्वाद घेण्यासाठी सरांच्या घरी गेलो होतो. त्यादरम्यान ते म्हणाले होते की 'माझ्यानंतर तुच आहेस', हा माझ्यासाठी बहुमोल आशीर्वाद होता. सरांकडून मी क्रिकेट मधील छक्के पंजे शिकलो आहे. खेळामध्ये या सारख्याच बारीक गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्याच गोष्टी मी आता माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्यात सकारात्मक बदल घडत आहे.' असं वक्तव्य चंद्रकांत पंडित यांनी केलं.
ते म्हणाले की, मी आचरेकर सरांशिवाय इतरांकडून देखील खूप काही शिकलो आहे. यात पॉली उमरीगर, अशोक मंकड यांचा समावेश आहे. अशोक मंकड यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. एखाद्या मॅचची योजना कशी करावी, ती मॅच कशी जिंकावी, त्यासाठी काय करावे, प्रत्येक खेळाडूकडून त्याची चांगली कामगिरी कशी करुन घेता येईल, हे सर्व गुण मी अशोक मंकड यांच्या कडून आत्मसात केले आहेत.'
'खेळपट्टी कशी आहे, खेळपट्टीतून आपल्याला मॅचदरम्यान काही मदत मिळेल का, हे सर्व मी पॉली उमरीगर यांच्या कडून शिकलो. खेळपट्टी अनुकूल आहे की प्रतिकूल आहे, हे समजणे फार कठीण असते. त्यामुळे खेळपट्टी कसा खेळ करेल, या सर्व गोष्टी मला उमरीगर यांच्या मुळे समजल', असं वक्तव्य पंडित यांनी केलं
'मी स्वत: जेव्हा खेळत होतो, तेव्हा सोबत असणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंकडून देखील खूप शिकण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न केला आहे. हा अनुभव मला आज देखील उपयोगी ठरत आहे', असं चंद्रकांत पंडित यांना वाटतं.
'जेव्हा मी दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत खेळायचो तेव्हा, प्रतिस्पर्धी टीममधील बॉलिंगला कशाप्रकारे डिफेन्स करायचे. कोणता बॉल कशाप्रकारे मारायचा, हे सर्व मला वेंगसरकर यांच्याकडून शिकायला मिळाल्याचं चंद्रकांत पंडित यांनी सांगितलं.
'तसेच सुनील गावस्कर यांच्या सोबत खेळण्याची संधी मिळायची, तेव्हा तेही खूप काही सांगायचे. जर तुम्हाला तुमच्या खेळात सकारात्मक बदल करायचे असतील तर तुम्हाला मॅचकडे गांभीर्याने पाहायला हवे', असं पंडित म्हणाले.
'मी आतापर्यंत माझ्या क्रिकेट कारकीर्दीत प्रशिक्षक आणि सहखेळाडूंकडून खूप काही शिकलो आहे. ज्याचा मला आज खूप फायदा होत आहे. मी जे काही शिकलो, अनुभवलं आहे, त्याबद्दल मी अनेकदा माझ्या शिष्यांसोबत बोलतो, असं विधान पंडित यांनी केलं.
चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षणाच्या नेतृत्वाखालीच विदर्भाने दोन वेळा सलग रणजी ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. यावरुनच त्यांच्यात असलेली प्रशिक्षकाची चुणूक दिसून येते. त्यांनी केवळ विदर्भालाच जेतेपद मिळवून दिंलय अस नाही, तर ते मुंबईचे प्रशिक्षक असताना त्यांनी मुंबईला देखील जेतेपद मिळवून दिले होते.
चंद्रकांत पंडित त्यांच्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. पंडित सर जे काही करतात ते आमच्या साठी लाभदायक ठरतं, त्यामुळे आमच्यात असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो. तसेच आमच्याकडून चांगली कामगिरी देखील होते, असं विदर्भ टीमचे खेळाडू म्हणतात.