भारतीय खेळाडूने शिव्या घातल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय

क्रिकेटच्या मैदानात खेळाडू आणि अंपायर यांच्यातले वाद नेहमीच पाहायला मिळतात.

Updated: Jan 3, 2020, 06:27 PM IST
भारतीय खेळाडूने शिव्या घातल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय title=

मोहाली : क्रिकेटच्या मैदानात खेळाडू आणि अंपायर यांच्यातले वाद नेहमीच पाहायला मिळतात. रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबचा युवा बॅट्समन शुभमन गिलने अंपायरला शिव्या दिल्या आहेत. आयएस ब्रिंदा स्टेडियममध्ये सुरु असलेल्या दिल्ली आणि पंजाबच्या मॅचमध्ये हा वाद झाला. शुभमन गिलने शिव्या दिल्यानंतर अंपायरने त्याचा निर्णय बदलला. हा सगळा तमाशा रोखण्यासाठी मॅच रेफ्रीला मैदानात यावं लागलं. दिल्ली आणि पंजाबमधली ही मॅच संपल्यानंतर शुभमनवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

अंपायरने आऊट दिल्यानंतर शुभमन गिलने मैदान सोडून जाण्यास नकार दिला. एवढच नाही तर त्याने अंपायरला अपशब्दही वापरले. शुभमनच्या या आक्रमक पवित्र्यानंतर अंपायरने त्याचा निर्णय बदलला, पण यानंतर दिल्लीची टीम नाराज झाली.

शुभमन गिलला कॅच आऊट देण्यात आलं होतं. विकेट कीपरने गिलचा कॅच पकडला होता. शुभमन या निर्णयामुळे नाराज झाला. अंपायरने निर्णय बदलल्यानंतर दिल्लीची टीमही भडकली आणि मैदानाबाहेर जाऊ लागली. मॅच रेफ्रीने मध्यस्ती केल्यानंतर मॅच पुन्हा सुरु झाली.

अंपायरशी वाद झाल्यानंतरही शुभमन गिल मोठी खेळी करु शकला नाही. २३ रन करुन शुभमन गिल पॅव्हेलियनमध्ये परतला. सिमरनजीत सिंगने गिलला आऊट केलं. शुभमन गिलकडे भारताचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून पाहिले जाते. आयपीएलमध्ये गिल कोलकात्याकडून खेळतो. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने शुभमनला कोलकात्याचा कर्णधार बनवण्याचा सल्लाही दिला होता.