रणजी ट्रॉफीमध्ये डीआरएसचा वापर?, टॉसही आऊट?

भारतामधल्या क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

Updated: May 20, 2019, 11:15 PM IST
रणजी ट्रॉफीमध्ये डीआरएसचा वापर?, टॉसही आऊट? title=

मुंबई : भारतामधल्या क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. काहीच दिवसांपूर्वी आयपीएलचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. यानंतर आता स्थानिक क्रिकेटवर अन्याय होऊ नये, म्हणून बीसीसीआयने रणजी ट्रॉफीसाठीच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. यामध्ये स्थानिक क्रिकेटसमोरच्या अडचणी आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

स्थानिक टीमचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी रणजी ट्रॉफीमध्ये डीआरएसचा वापर करण्यात यावा अशी मागणी केली. मागच्या वर्षीच्या रणजी मोसमात खराब अंपायरिंगवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. डीआरएसचा वापर हा फक्त आंतरराष्ट्रीय मॅच आणि आयपीएलमध्येच केला जातो, पण मागच्या मोसमात मॅचची संख्या वाढल्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रासोबतच डीआरएस लागू करावा अशी मागणी केली.

डीआरएसबरोबरच टॉसची पद्धत रद्द करावी आणि पाहुण्या टीमला बॅटिंग किंवा बॉलिंग निवडण्याचं स्वातंत्र्य देण्यात यावं, अशीही मागणी करण्यात आली. याचबरोबर खेळाचा स्तर सुधारण्याबाबत, बॉलची गुणवत्ता, स्लो ओव्हर रेट यावरही चर्चा करण्यात आली. स्थानिक क्रिकेटमध्ये आता एकूण ३७ टीम झाल्या आहेत, त्यामुळे दुलीप ट्रॉफी, इराणी ट्रॉफी सुरू ठेवण्याबद्दलही चर्चा झाली. यावर कर्णधार आणि प्रशिक्षकांची मत मागण्यात आली.

मागच्या मोसमात रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये कर्नाटकविरुद्ध सौराष्ट्रचा बॅट्समन चेतेश्वर पुजाराला नॉट आऊट देण्यात आलं होतं. चेतेश्वर पुजाराच्या बॅटला बॉल लागून कॅच पकडण्यात आला होता. या मॅचमध्ये पुजाराने शतक केलं आणि सौराष्ट्रने फायनलमध्ये धडक मारली होती.

सध्या बीसीसीआयला एड-हॉक समिती चालवत आहे. या मतांना लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया अवलंबली जाते. हे सल्ले अवलंबायचे असतील, तर बीसीसीआयच्या तांत्रिक समितीची मंजुरी गरजेची असेल. यानंतर सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागेल. या दोघांपैकी एकही समिती सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे याची अंमलबजावणी कधी होणार? हा खरा प्रश्न आहे.