Ravichandran Ashwin : राजकोट टेस्टमधून टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर आश्विन याने काढता पाय घेतला होता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अश्विनच्या आईची प्रकृती खालावल्याची माहिती दिली होती. मी त्याच्या आईला लवकर बरं होण्याची मी आशा व्यक्त करतो. त्याला राजकोट टेस्ट सोडून आईसोबत (Ravichandran Ashwin Mother) राहण्यासाठी चेन्नईला जावं लागलंय, असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं होतं. अशातच आता आश्विनची पत्नी प्रितीने (R Ashwin wife Prithi Narayanan) नेमकं काय झालं होतं? आणि पुजाराने कशी मदत केली यावर खुलासा केला आहे.
काय म्हणाली आश्विनची पत्नी?
आम्ही सर्वजण कसोटी सामन्यात आश्विनच्या 500 विकेट्सच्या प्रतिक्षेत होतो. राजकोट कसोटी सामन्यादरम्यान झालं असं की, मुलं शाळेतून घरी आली अन् पुढच्या पाच मिनिटात आश्विनने 500 वी विकेट घेतली. त्यामुळे आम्ही सर्वजण आनंदात होतो. त्यावेळी मला अनेकांचे फोन येत होते. त्यावेळी अचानक आईंच्या ओरडण्याचा आवाज आला. मी जाऊन पाहिलं तर पडल्या होत्या. त्यांना घेऊन लगेच आम्ही हॉस्पिटल गाठलं. मला काय करावं सुचत नव्हतं. त्यावेळी मी काहीही विचार न करता चेतेश्वर पुजाराला कॉल केला.
पुजाराच्या कुटूंबियांनी मला खूप मदत केली. राजकोट दरम्यान चांगली फ्लाइट कनेक्टिव्हिटी नसल्याने आम्ही अश्विनला याबद्दल न सांगण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी सुचवलं की तिच्या मुलाला त्यांच्यासोबत ठेवणं चांगलं राहिल. त्यामुळे आम्ही आश्विनला कॉल केला अन् झालेली घटना सांगितली. त्यावेळी आश्विनने अस्वस्थ झाला होता. त्याने काहीही न बोलता फोन कट केला. त्यानंतर त्याने 20 मिनिटांनी मला फोन केला. बीसीसीआयने आणि संघाच्या खेळाडूंनी आश्विनला मदत केली आणि तो आईला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला.
आश्विनने आपल्या आईला आयसीयूमध्ये पाहिलं. तेव्हा तो भावूक झाला होता. आईला बरं होताना पाहिल्यावर आम्ही त्याला पुन्हा संघात जाण्यासाठी सांगितलं. तो असं सामना कधीच मध्येच सोडून जात नाही. वाढत्या वयानुसार परिपक्वता वाढत आहे. त्याला आता आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवण्याची इच्छा आहे, असं म्हणत प्रितीने निवृत्तीचे संकेत दिलेत का? असा सवाल विचारला जात आहे.
बीसीसीआयकडून मदतीचा हात
कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे रविचंद्रन अश्विनने ( Ravichandran Ashwin ) तत्काळ टेस्ट टीममधून माघार घेतली आहे. या आव्हानात्मक काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि संघ अश्विनला पूर्ण पाठिंबा देतं. बीसीसीआय चॅम्पियन क्रिकेटर आणि त्याच्या कुटुंबाला आपला पाठिंबा देतो. खेळाडू आणि त्यांच्या प्रिय व्यक्तींचं आरोग्य आणि कल्याण हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असं बीसीसीआयने म्हटलं होतं. त्यावेळी सचिव जय शहा यांनी आश्विनसाठी हेलिकॅप्टरची देखील व्यवस्था केली होती.