रिंकूने उजव्या हाताने मारलेला षटकार पाहून कर्णधार सूर्यकुमार अवाक, उठून उभा राहिला अन्...; पाहा VIDEO

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात रिंकू सिंगने तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्याने लगावलेल्या एका षटकाराने सगळ्यांनाच अवाक केलं.   

शिवराज यादव | Updated: Dec 2, 2023, 01:05 PM IST
रिंकूने उजव्या हाताने मारलेला षटकार पाहून कर्णधार सूर्यकुमार अवाक, उठून उभा राहिला अन्...; पाहा VIDEO title=

भारतीय क्रिकेटला रिंकू सिंगच्या रुपात आणखी एक स्फोटक फलंदाज सापडला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या टी-20 सामन्यात रिंकू सिंगने 29 चेंडूत 46 धावा ठोकत पुन्हा एकदा आपल्या तुफान फलंदाजीची झलक दाखवली. रायपूर येथे झालेला हा सामना जिंकत भारताने 3-1 ने आघाडी घेत मालिकाही जिंकली आहे. या सामन्यात अनेक उत्कृष्ट फटके पाहण्यास मिळाले. यामधील एक फटका रिंकू सिंगने मॅथ्यू शॉर्टच्या गोलंदाजीवर लगावला होता. रिंकू सिंगने षटकार लगावल्यानंतर प्रेक्षकांसह कर्णधार सूर्यकुमार यादवही आश्चर्यचकित झाला होता. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेत संधी न मिळालेल्या अक्षर पटेलने या सामन्यात 16 धावांवर 3 गडी बाद केले. भारताने हा सामना 20 धावांनी जिंकला. 

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रिंकू सिंगने 29 चेंडूत 46 आणि जितेश शर्माने 19 चेंडूत 35 धावा  ठोकत स्फोटक फलंदाजी केली. पण ऑस्ट्रेलियाने 174 धावातच भारतीय संघाला रोखलं. 18.3 ओव्हरमध्ये भारताची धावसंख्या 167 वर 4 गडी बाद होती. पण नंतर भारताने फक्त 7 धावात 5 विकेट गमावले.

भारतीय गोलंदाजांनी यावेळी उत्तम कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला फक्त 154 धावांत रोखलं. ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद झाला. हा सामना जिंकत भारताने मालिकेत 3-1 ची विजयी आघाडी घेतली आहे. मॅथ्यू वेड 23 चेंडूत 36 धावांवर नाबाद राहिला. अक्षर पटेलने 16 चेंडूत 3 गडी बाद केले.