Roger Binny: रॉजर बिन्नी यांना BCCI अध्यक्ष करण्यामागचं राजकारण काय?

BCCI मध्ये राजकारण सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. सौरव गांगुली यांना पुन्हा अध्यक्षपद न दिल्याने काही जण टीका करत आहेत.

Updated: Oct 18, 2022, 06:08 PM IST
Roger Binny: रॉजर बिन्नी यांना BCCI अध्यक्ष करण्यामागचं राजकारण काय?  title=

मुंबई : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन (BCCI President) सौरव गांगुलीची (Saurav Ganguly) गच्छंती केल्यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger binny) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) नवे अध्यक्ष झाले आहेत. बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या वार्षिक बैठकीत बिन्नी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला बीसीसीआयचे सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ यांच्यासह सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नीही उपस्थित होते. सौरव गांगुलीची जागा आता रॉजर बिन्नी घेणार आहेत.

बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदावर सौरव गांगुली यांची पुन्हा निवड का करण्यात आली नाही याबाबत अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने आरोप केला की, गांगुलीवर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यांनी नकार दिल्याने अमित शहा यांच्या सांगण्यावरून गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवले गेले. भाजपने अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, बीसीसीआय ही एक स्वतंत्र संस्था आहे, तिचे सदस्य आणि पदाधिकारी स्वतःचे निर्णय घेतात. यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही.

सौरव गांगुलीच्या जागी बिन्नी यांना बीसीसीआयचे अध्यक्ष का करण्यात आले, हा प्रश्न आहे. यामागे काय कारण आहे? यात खरंच काही राजकारण आहे की नाही? चला समजून घेऊया...
 
रॉजर बिन्नी यांना बीसीसीआयचे नवे अध्यक्ष का बनवण्यात आले?

रॉजर बिन्नी यांचा जन्म 19 जुलै 1955 रोजी बंगळुरू येथे झाला. 67 वर्षीय बिन्नी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू आहेत. बिन्नी हे भारतीय क्रिकेट संघात खेळणारे पहिले अँग्लो-इंडियन खेळाडू होते. त्यांचे पूर्वज स्कॉटलंडहून भारतात येऊन स्थायिक झाले.

आपल्या खेळातून त्यांनी खूप नाव कमावले. 1977 मध्ये बिन्नी यांनी केरळविरुद्ध कर्नाटक संघाकडून 211 धावांची खेळी खेळली होती. यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांचे नाव चर्चेत आले. बिन्नी यांनी 1979 मध्ये पाकिस्तानविरुद्ध राष्ट्रीय संघात पदार्पण केले होते.

बिन्नी भारतीय संघासाठी 27 कसोटी आणि 72 एकदिवसीय सामने खेळले आहेत. बिन्नी यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 9 ऑक्टोबर 1987 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. 1983 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा बिन्नी देखील एक भाग होते. या विश्वचषकात त्यांनी 18 विकेट घेतल्या होत्या.

बिन्नी यांची प्रामाणिक प्रतिमा

क्रीडा प्रशासक म्हणून रॉजर बिन्नी यांची प्रतिमा अतिशय स्पष्ट आहे. रॉजर बिन्नी 2012 मध्ये बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीमध्ये होते. त्यानंतर त्यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीही भारतीय संघाचे दार ठोठावत होता. बीसीसीआयशी संबंधित लोक सांगतात की त्या काळात जेव्हा जेव्हा निवड समितीच्या बैठकीत स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर विचार व्हायचा तेव्हा रॉजर मीटिंगमधून उठून बाहेर पडत असे. 2014 मध्ये त्यांचा मुलगा स्टुअर्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. स्टुअर्ट बिन्नीने भारताकडून 6 कसोटी, 14 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळले.

रॉजर बिन्नी यांच्या निवडीत खरंच काही राजकारण आहे की नाही?

बीसीसीआयचा सुरुवातीपासून राजकारणाशी संबंध आहे. बहुतांश प्रशासक राजकीय होते. मग ते राजीव शुक्ला असो वा अनुराग ठाकूर. सगळे राजकारणाशी निगडीत आहेत. सध्याचे सचिव जय शाह हे स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे अनेक निर्णय राजकारणाशी संबंधित आहेत. रॉजर बिन्नी यांना अध्यक्ष बनवण्याचे प्रकरणही राजकारणाशी जोडले जात आहे.

लोढा समितीच्या शिफारशींमुळे बिन्नी किंवा माजी क्रिकेटपटूलाच अध्यक्ष बनवता येईल. त्यामुळे या पदावर कोणतीही राजकीय व्यक्ती बसू शकली नाही. म्हणूनच, जर तुम्ही असा चेहरा शोधत असाल तर तो स्थिर आणि निष्कलंक असावा. बिन्नी 67 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा पहिला टर्म संपेपर्यंत ते ७० वर्षांचे असतील. अशा स्थितीत लोढा समितीच्या शिफारशींनुसार त्यांना दुसरी टर्म देण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच सौरव गांगुली यांना दुसरी टर्म न दिल्याने जो वाद झाला, बीसीसीआयला बिन्नीच्या बाबतीत अशा कोणत्याही वादाला सामोरे जावे लागणार नाही.