मुंबई : देशातील नागरिकांची आज सकाळी झाली ती फार वाईट बातमीने. गानकोकिळा लता मंगेशकर याचं सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झालं. लता दीदींची गाणी ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत. शिवाय त्यांचा क्रिकेटशी संबंधही खूप मोठा होता. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत त्यांचं खास नातं होतं.
लता मंगेशकर या सचिन तेंडुलकरसाठी आईसमान होत्या. या दोघांमध्ये खूप खास होतं. लता मंगेशकर यांनी सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला जावा असं म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर सचिनने अनेकवेळा लता दीदींबद्दलचा आदर जाहीरपणे व्यक्त केला. लता दीदी आणि सचिन तेंडुलकर या दोघांमध्ये खूप जवळचं नातं होतं.
सचिनसोबतच्या नात्याबद्दल बोलताना लता मंगेशकर म्हणाल्या की, "सचिन मला आई मानतो आणि मी त्याच्यासाठी नेहमी आईप्रमाणे प्रार्थना करते. त्याने मला पहिल्यांदा आई म्हटले तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. मला त्याची अपेक्षा नव्हती. माझ्यासाठी ते आश्चर्यकारक होतं. त्याच्यासारखा मुलगा मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते."
2017 मध्ये सचिन तेंडुलकरचा बायोपिक आला होता. 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' रिलीज झाला तेव्हाही लता मंगेशकर यांनी सोशल मीडियाद्वारे सचिनला शुभेच्छा दिल्या होत्या.
लता मंगेशकर या 92 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली. लता मंगेशकर यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.