नवी दिल्ली : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या (Hyderabad Gangrape-Murder Case) करणाऱ्या चारही आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार केलं. या घटनेवर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. बलात्कार आणि हत्या प्रकरणात क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी पोलीस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इथून पळून जाण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले.
कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन व्हायला हवं, असं काहींचं मत असलं तरी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील या आरोपींच्या एन्काऊंटरचं अधिकाधिक लोकांनी स्वागतच केलंय. खेळाडूही यात मागे नाहीत.
हैदराबादमध्ये राहणाऱ्या सायना नेहवाल (Saina Nehwal) हिनंही आरोपींच्या एन्काऊन्टरसाठी पोलिसांचं कौतुक केलंय.
बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिनं ट्विट करत पोलिसांच्या या कामगिरीला सलाम ठोकलाय. 'हैदराबाद पोलिसांनी खूपच चांगलं काम केलंय... आम्ही तुम्हाला सलाम करतो' असं सायनानं सोशल मीडियावर म्हटलंय.
Great work #hyderabadpolice ..we salute u
— Saina Nehwal (@NSaina) December 6, 2019
खेळाडूंसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटिजनंही हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलंय. तर बलात्काराच्या घटनेनंतर आरोपींना शिक्षा देण्यासाठी 'झुंडशाही'चा पुरस्कार करणाऱ्या अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 'देर आए, दुरुस्त आए' असं जया बच्चन यांनी म्हटलंय.
अभिनेता ऋषी कपूर, अनुपम खेर यांनीही बलात्कारातील आरोपींच्या एन्काऊंटरवर आनंद व्यक्त केलाय.