भारत-वेस्ट इंडिज सीरिजमध्ये पहिल्यांदाच वापरला जाणार हा नियम

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या टी-२० सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे.

Updated: Dec 6, 2019, 01:44 PM IST
भारत-वेस्ट इंडिज सीरिजमध्ये पहिल्यांदाच वापरला जाणार हा नियम

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या टी-२० सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. ३ टी-२० मॅचच्या सीरिजनंतर दोन्ही देशांमध्ये वनडे सीरिजही खेळवली जाणार आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच थर्ड अंपायर नो बॉलचा निर्णय देणार आहे. बीसीसीआयचे संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांनी ही माहिती दिली.

नो बॉलमुळे मागच्या काही दिवसांमध्ये वाद निर्माण झाले होते. ज्या तंत्रज्ञानाने आपण याची माहिती घेऊ शकतो त्याचा उपयोग केला गेला पाहिजे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध आम्ही याचा वापर करणार आहोत, असं जयेश जॉर्ज म्हणाले. हा प्रयोग यशस्वी झाला तर आयपीएलमध्येही अशाच प्रकारे नो बॉल थर्ड अंपायर बघेल, असे संकेतही बीसीसीआयकडून देण्यात आले आहेत. 

आयसीसीने दिलेल्या वक्तव्यानुसार, थर्ड अंपायरची नजर पायाच्या नो बॉलवर असेल. थर्ड अंपायरला नो बॉल असल्याचं लक्षात आल्यावर तो याबाबत मैदानातल्या अंपायरला माहिती देईल, यानंतर मैदानातला अंपायर नो बॉल असल्याचं घोषित करेल. संशयाच्या स्थितीमध्ये फायदा बॉलरला दिला जाईल.