Tokyo Olympic : महाराष्ट्राचा पठ्ठ्या हरला, पण जबरदस्त लढला

साताऱ्याच्या एका ग्रामीण भागातून आलेल्या प्रवीण जाधवने पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळताना सर्वांना प्रभावित केलं आहे

Updated: Jul 28, 2021, 04:58 PM IST
Tokyo Olympic : महाराष्ट्राचा पठ्ठ्या हरला, पण जबरदस्त लढला

टोकियो : साताऱ्यातील एक छोटसं गाव ते थेट ऑलिम्पिक असा प्रवास करणारा महाराष्ट्राचा पठ्ठ्या प्रवीण जाधवने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैयक्तिक तिरंजादी स्पर्धेतील प्रवीणचं आवाहन संपुष्टात आलं असलं तरी त्याच्या कामगिरिचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

पुरुष एकेरीत भारताचं प्रतिनिधित्व करणारा तिरंदाज प्रवीण जाधव (Pravin Jadhav) याने स्पर्धेत सुरुवात दमदार केली. प्रविणने तिरंदाजीमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गलसान बझारझापोव्हला हरवलं. एलिमेनशन राऊण्डमध्ये प्रविणने ही भन्नाट कामगिरी केली. एलिमिनेशन राऊण्डमध्ये 32 जणांच्या फेरीत प्रविणने गलसान बझारझापोव्हला पराभूत करत 16 जणांच्या फेरीत प्रवेश केला. पण त्यानंतर दुसऱ्या फेरीत जगातील नंबर एक तिरंदाज असणाऱ्या अमेरिकेच्या एलिसन ब्राडीने प्रवीणला नमवलं आणि प्रवीणला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं.

साताऱ्याच्या एका ग्रामीण भागातून आलेल्या प्रवीण जाधवने पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळताना सर्वांना प्रभावित केलं आहे. प्रविणचा प्रवास हा सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखा आहे.

कोण आहे प्रविण जाधव?

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या सरडे या छोट्याशा गावातील प्रवीण रमेश जाधव याने आज महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. प्रवीण जाधवची घराची परिस्थिती खूपच बेताची, आई शेतमजूर आणि वडील देखील सेंटरिंगच्या कामावर रोज जातात. रोज काम केल्या शिवाय त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही अशी बिकट परिस्थिती असताना देखील प्रवीण जाधवने कष्ट आणि जिद्द उराशी बाळगली. देशासाठी खेळण्याचं स्वप्न आणि एकच ध्येय समोर ठेवून वाटचाल करत राहिला.

नेदरलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत प्रविणने सांघिक रौप्यपदकाची कमाई करत ऑलिम्पिक कोटा मिळवला. याआधी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 2005 साली भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 

सातारा जिल्ह्यातील प्रवीणच्या संघर्षाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली होती. 'प्रवीण सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतो. तो एक महान तिरंदाज आहे. त्याचे आई-वडील मजुरी करुन कुटुंब चालवतात. त्यांचा मुलगा आता टोकियो ऑलिम्पिकला जात आहे. ही फक्त त्याच्या आई-वडिलांसाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे," या शब्दात पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमात त्याचा गौरव केला होता.