बंगळुरू : भारत आणि अफगाणिस्तानमध्ये ऐतिहासिक टेस्ट मॅच सुरु आहे. अफगाणिस्तानची ही पहिलीच टेस्ट मॅच आहे. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनिंगला आलेल्या शिखर धवन आणि मुरली विजयनं भारताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. पहिल्याच सत्रामध्ये शिखर धवननं त्याचं शतक पूर्ण केलं. धवनची नाबाद 104 रन आणि विजयच्या नाबाद 41 रनमुळे भारतानं पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता 158 रन केले होते. पहिल्या सत्रानंतर मात्र शिखर धवन आऊट झाला. धवननं 96 बॉलमध्ये 107 रन केले. धवनच्या खेळीत 19 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.
टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या इनिंगच्या पहिल्या सत्रात शतक करणारा धवन हा सहावा बॅट्समन तर पहिला भारतीय आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचे माजी विकेट कीपर ट्रंपर, चार्ली मॅकार्टनी, डॉन ब्रॅडमन, डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानच्या माजीद खाननं हे रेकॉर्ड बनवलं होतं.
ऑस्ट्रेलियाच्या ट्रंपर यांनी 1902 साली मॅन्चेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगच्या पहिल्या सत्रात 103 रन केले होते. ऑस्ट्रेलियाच्याच मॅकार्टनी यांनी 1926 साली इंग्लंडविरुद्धच 112 रन केले होते. सर डॉन ब्रॅडमन यांनी 1930 साली लीड्स मैदानात 105 रनची शतकीय खेळी केली होती. पाकिस्तानच्या माजीद खान यांनी 1976-77 साली कराचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 108 रन केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं 2016-17 साली सिडनीमध्ये झालेल्या टेस्ट मध्ये पाकिस्तानविरुद्ध 100 रन केले होते. यामध्ये आता शिखर धवनचं नाव जोडलं गेलं आहे.
याचबरोबर शिखर धवनच्या नावावर आणखी एका रेकॉर्डची नोंद झाली आहे. अफगाणिस्तानची टेस्ट क्रिकेटमधली शिखर धवन ही पहिली विकेट ठरला आहे. अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर यामीन अहमदजईच्या बॉलिंगवर मोहम्मद नबीनं स्लिपमध्ये धवनचा कॅच पकडला.
शिखर धवननं आत्तापर्यंत 30 मॅचच्या 50 इनिंगमध्ये 43.84 च्या सरासरीनं 2,153 रन केल्या आहेत. यामध्ये 7 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.