ODI World Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना कोणत्याही स्पर्धेत झाला तरी तो चर्चेचा विषय असतो. एकमेकांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेला हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष अशा सामन्यांकडे असते. त्यात हा सामना विश्वचषक स्पर्धेतील असेल तर चर्चा अधिकच असते. लवकरच हे दोन्ही संघ आशिया चषक 2023 मध्ये आणि त्यानंतर वर्षाच्या शेवटी आयसीसीच्या वनडे वर्ल्डकप 2023 मध्येही दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. विरोधी संघाला पराभूत करण्याच्या इराद्यानेच दोन्ही संघ मैदानात उतरतील यात शंका नाही. मात्र याच सामन्याबद्दल आता भारताचा सलामीवीर शिखर धवनने एक विधान केलं आहे. धवन नेमकं काय म्हणाला आहे पाहूयात...
शिखर धवनने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "नेहमी असं होत आलं आहे की भारत वर्ल्डकप जिंको अथवा नाही, मात्र पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकणं महत्त्वाचं असतं. अर्थात वर्ल्डकप जिंकणंही महत्त्वाचं आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की यंदा आम्हाला वनडेचा वर्ल्डकप जिंकू दे," असं म्हटलं आहे. भारतीय संघामधून मागील बऱ्याच काळापासून बाहेर असलेल्या धवनने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलताना, "जेव्हा भारत पाकिस्तानचा सामना होतो तेव्हा मनात वेगळेच विचार असतात. मी जेवढ्यांदा पाकिस्तानविरुद्ध खेळलो आहे तेवढ्यांदा भारत जिंकला आहे," असंही म्हटलं.
शिखर धवन हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने अनेकदा एकट्याच्या जीवावर भारतीय संघाला विजय मिळवून दिलाय किंवा विजय सुखकर केला आहे. मात्र मागील बऱ्याच काळापासून शिखर धवनला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. शिखर धवनला आशिया चषक स्पर्धेमध्ये किंवा वनडे वर्ल्डकप स्पर्धेमध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा वनडे वर्ल्डकप स्पर्धेमधील सामना नियोजित वेळापत्रकानुसार 15 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मात्र या तारखेसंदर्भात सध्या संभ्रम व्यक्त केला जात आहे. ही तारीख बदलली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर हा सामना होणार आहे. मात्र नवरात्रीमुळे या सामन्याच्या तारखांमध्ये बदल करावा अशी मागणी सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आल्याने तारखेबद्दलचा फेरविचार केला जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे. हा सामना आता 14 तारखेला म्हणजेच नियोजित दिवसाच्या एक दिवस आधीच शेअर केला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबद्दल आयसीसी किंवा बिसीसीआयकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.