मुंबई : सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकर श्रेयस अय्यरचा धमाका सुरूच आहे. मध्य प्रदेशविरुद्धच्या मॅचमध्ये १४३ रनचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरनं ५५ बॉलमध्ये नाबाद १०३ रनची खेळी केली. या खेळीत त्यान पाच फोर तर १० सिक्स लगावले. सूर्यकुमार यादवनं श्रेयस अय्यरला चांगली साथ दिली. सूर्यकुमारनं ३६ बॉलमध्ये नाबाद ३९ रनची खेळी केली. श्रेयस अय्यरच्या या खेळीमुळे मुंबईनं ही मॅच ८ विकेटनं जिंकली.
मध्य प्रदेशने या मॅचमध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण मध्य प्रदेशचा १९.३ ओव्हरमध्येच १४३ रनवर ऑल आऊट झाला. मध्य प्रदेशकडून सर्वाधिक रजत पाटिदारने ४७ रन केल्या. तर मुंबईकडून बॉलिंग करताना तुषार देशपांडेने ४ आणि शार्दुल ठाकूर, धवल कुलकर्णी आणि शम्स मुलानी या तिघांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
याआधी २१ फेब्रुवारीला सिक्कीमविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये देखील श्रेयस अय्यरने ५५ बॉलमध्ये १४४ रन कुटले होते. या खेळीत त्याने ७ फोर तर तब्बल १५ सिक्सचा पाऊस पाडला होता. या खेळीमुळे श्रेयस अय्यर हा टी-२० क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन करणारा भारतीय बनला होता.