Ind vs Eng Test: भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडचा पराभव करण्याच्या हेतूने बाह्या सरसावल्या आहेत. रांचीमध्ये हा चौथा कसोटी सामना होत असून तो जिंकत भारतीय संघाचा मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे इंग्लंड संघ पराभवाचा वचपा काढत बरोबरी साधण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. जर चौथा सामना इंग्लंडने जिंकला तर पाचवा कसोटी सामना निर्णायक ठरेल. दरम्यान या सामन्याआधी शुभमन गिलने (Shubman Gill) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) आठवण काढली आहे. रांचीत हा सामना होणार असल्याने शुभमन गिलने धोनीचा उल्लेख केला.
23 फेब्रुवारीला म्हणजेच शुक्रवारपासून भारत आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. रांचीमधील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडिअम कॉम्प्लेक्समध्ये हा सामना होणार आहे. सामन्याआधी रांचीत झालेला पत्रकार परिषदेत शुभमन गिलने धोनीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. धोनीच्या शहरात खेळत असल्याने त्याने धोनीची आठवण काढली.
"संपूर्ण भारताला माहीभाईची फार उणीव भासत आहे. तुम्ही रांची किंवा कुठेही खेळलात तरी तुम्हाला त्याची आठवण येत असते," असं शुभमन गिलने पत्रकार परिषदेत सांगितलं.
महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी अद्याप त्याची प्रसिद्धी कमी झालेली नाही. 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनी आयपीएल खेळणार असल्याने चाहते आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत. हा आयपीएल हंगाम धोनीचा अखेरचा असण्याची शक्यता आहे. 42 वर्षीय धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने गतवर्षी पाचव्यांदा आयपीएल जिंकली होती. पाचवेळा आयपीएल जिंकत धोनी सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.
दरम्यान ध्रुव पटेलने राजकोटमध्ये इंग्लंडविरोधातील सामन्यातून भारतीय संघात कसोटीमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानेही महेंद्रसिंग धोनीने आपल्याला कशाप्रकारे प्रेरित केलं याबद्दल सांगितलं आहे.
"मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा जागेवरच उभा राहिलो होतो. खरंच धोनी माझ्यासमोर उभा आहे का असा विचार मी करत होतो. मी तेव्हा पहिल्यांदाच धोनीशी बोलत होतो. स्वप्न वाटत असल्याने मी स्वत:ला चिमटे काढून पाहत होतो. मी 2021 मध्ये त्याला भेटलो होतो. तो माझा पहिला आयपीएल हंगाम होता. मी त्याला एक फोटो काढू शकतो का असं विचारलं आणि फोटो काढला. त्याने मला मैदानात जा आणि चेंडूकडे लक्ष देऊन खेळ असा सल्ला दिला," असं ध्रुव पटेलने सांगितलं.
"माहीभाईला भेटणं हे नेहमी माझं स्वप्न होतं. मी आयपीएलमध्ये त्याला शेवटचं भेटलो होतो. पण मला त्याला भारतीय जर्सीत भेटायचं होतं. मी जेव्हा कधी त्याच्याशी बोलतो तेव्हा काहीतरी शिकण्यास आणि क्रिकेट खेळण्यात फार मदत होते. मी रांचीत त्याला भेटून संवाद साधण्याचा प्रयत्न करेन," असंही त्याने सांगितलं.