Sonali Bendre On Shoaib Akhtar Marriage Proposal: बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बंद्रेने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या एका विधानावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. आपल्याला सोनाली बेंद्रे फार आवडते या शोएबच्या विधानावर सोनालीने एका पॉडकास्टमध्ये प्रतिक्रिया नोंदवली. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने एकदा त्याला कोणती भारतीय अभिनेत्री आवडते यासंदर्भात भाष्य करताना सोनालीबद्दलच्या प्रेमाचा खुलासा केला होता. काही वर्षानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा हा व्हिडीओ सोनालीच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओसंदर्भात सोनालीला थेट प्रश्न विचारण्यात आला आणि तिनेही यावर दिलखुलासपणे उत्तर दिलं.
मल्टीस्टारर 'हम साथ साथ है' चित्रपपटामध्ये झळकलेल्या सोनालीसंदर्भात बोलताना शोएब अख्तरने मस्करीत आपण तिला लग्नासाठी मागणीही घालू शकतो असं म्हटलं होतं. शोएब एवढ्यावरच थांबला नव्हता तर सोनालीने लग्नासाठी नकार दिला तर आपण तिचं अपहरण करु असंही म्हटलं होतं. शोएबच्या या विधानाची दोन्ही देशातील त्यावेळेस क्रिकेट चाहत्यांबरोबरच मनोरंजन क्षेत्रातही चांगलीच चर्चा झाली होती. याच व्हिडीओबद्दल भारतामधील युट्यूबर शुभांकर मिश्राने सोनालीला थेट प्रश्न विचारला.
शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये त्याने सोनालीला तू पाकिस्तानामध्येही प्रचंड लोकप्रिय असल्याचं सांगितलं. याचाच संदर्भ देत शोएबने तिच्या अपहरणाबद्दल केलेल्या विधानाचा उल्लेख केला आणि यावर तुझं काय मत आहे असं विचारलं. हा प्रश्न ऐकून सोनालीने शोएब हे असं काहीतरी बोलला असेल हे कितपत खरं आहे याबद्दल आपल्याला शंका असल्याचं सांगितलं. "हे कितपत खरं आहे मला ठाऊक नाही. त्याकाळातही खोट्या बातम्या वेगाने पसरायच्या," असं सोनाली शोएबच्या कथित प्रपोजलवर प्रतिक्रिया नोंदवताना म्हणाली. सोनालीला शोएब तुझा मोठा चाहता आहे असं म्हणत शुभांकरने पुन्हा एकदा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर सोनालीने, "मी देवाची यासाठी आभारी आहे कारण त्यांच्यामुळेच (चाहत्यांमुळेच) माझं करिअर झालं," असं उत्तर हसत दिलं.
शुभांकर मिश्राने सोनालीला केवळ शोएब अख्तरच नाही तर भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाही तिचा फार मोठा चाहता होता असं आवर्जून सांगितलं. सोनाली बेंद्रचं नाव घेतलं तरी सुरेश रैना लाजायचा, असं शुभांकरने सोनालीला सांगितल्यानंतर तिने यावर हसून प्रतिसाद दिला.