IPL 2024 Fan Hide Ball In Pant: इंडियन प्रिमिअर लीगच्या 60 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सदरम्यान कोलकात्यामधील ईडन गार्डनसमध्ये खेळवण्यात आला. 11 मे रोजी झालल्या या सामन्यामध्ये एक विचित्र घटना घडली. सीमेपार मारलेला चेंडू एक चाहता चोरुन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. अखेर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या मुलाने चेंडू परत केला. मात्र या मुलाने त्याच्या पॅण्टमध्ये चेंडू लपवण्याचा किळसवाणा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
मुंबई आणि कोलकात्यादरम्यानच्या या सामन्यामध्ये पावसाने व्यत्यय आणल्याने सामना उशीरा सुरु झाला. हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय गेतला. कोलकात्याच्या फलंदांजांनी एकूण 9 षटकार लगावले. त्यांनी 7 गड्यांच्या मोबदल्यात पावसामुळे कमी षटकांचा सामना खेळवताना निर्धारित 16 ओव्हरमध्ये 157 धावा केल्या. कोलकात्याच्या फलंदाजांनी मारलेल्या या षटकारांपैकी एक षटकार स्टॅण्डमध्ये पडला तेव्हा केकेआरच्या रिंकू सिंहच्या नावाची जर्सी घालून असलेल्या एका तरुणाने चेंडू उचलला. त्याने हा चेंडू पुन्हा मैदानात फेकण्याऐवजी थेट आपल्या पॅण्टमध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
पोलीस कर्मचाऱ्याने दाखवला इंगा
एक व्यक्ती या मुलाकडून हा चेंडू घेण्याचा प्रयत्न करत असताना हा तरुण चेंडू देण्यास नकार देत होता. अखेर एक पोलीस कर्मचारी तिथे आला आणि त्याने दम देत या तरुणाकडे चेंडू मागितला. तरुणाने आपल्या पॅण्टमधून चेंडू काढून पोलिसाला दिला. पोलिसाने हा चेंडू पुन्हा मैदानात फेकल्यानंतर या तरुणाला मैदानातून बाहेर काढलं. दरम्यान स्टॅण्डमध्ये हा सारा गोंधळ सुरु असताना चेंडू मैदानाबाहेर असल्याने खेळ थांबला होता. सर्वच खेळाडू आपआपल्या जागी उभे राहून प्रेक्षकांच्या गर्दीतून चेंडू पुन्हा कधी मैदानात फेकला जातो याची वाट पाहत उभे असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
Ball pent me pic.twitter.com/2gG8EtBizf
— Professor Sahab (@ProfesorSahab) May 13, 2024
या तरुणाच्या हाती लागलेला हा चेंडू स्वत:कडे ठेवायचा होता. मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावला. कोलकात्याच्या संघाने घरच्या मैदानावर सात सामने खेळले असून सर्वच सामन्यांना चाहत्यांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. कोलकाताचा या पर्वातील घरच्या मैदानावरील हा शेवटचा सामना होता. त्यामुळे सामना संपल्यानंतर खेळाडूंनी चाहत्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी मैदानात एक फेरी मारत सर्वांचे आभार मानले. अनेक खेळाडूंनी चाहत्यांना भेट म्हणून टेनिस बॉल स्टॅण्डमध्ये फेकले. कोलकात्याने मुंबईविरुद्धचा हा सामना 16 धावांनी जिंकला. या विजयासहीत कोलकात्याचं प्लेऑफमधील स्थान निश्चित झालं.