कोलंबो : श्रीलंकेचा क्रिकेटपटू लसिथ मलिंगाची पत्नी आणि श्रीलंकेचा ऑलराऊंडर थिसारा परेरा यांच्यामध्ये फेसबूकवर बाचाबाची झाली आहे. या सगळ्या प्रकारानंतर थिसारा परेरानं श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डिसिल्व्हा यांना पत्र लिहिलं आहे, अशी बातमी ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घाला, कारण एका व्यक्तीच्या वैयक्तिक वैरामुळे आमचं हसं होत असल्याचं परेरा या पत्रात म्हणाला आहे.
लसिथ मलिंगाची पत्तनी तान्या परेरानं थिसारा परेरावर आरोप केले आहेत. श्रीलंकेच्या टीममधलं स्थान निश्चित करण्यासाठी थिसारा परेरानं श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांची मदत मागितल्याचा आरोप तान्यानं केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तान्यानं एक फेसबूक पोस्ट केली होती. आरोप करण्याआधी २०१८ सालचं माझं वनडे क्रिकेटमधलं रेकॉर्ड बघा असं सांगत परेरानं स्वत:चं म्हणणं मांडलं. यानंतरही तान्यानं फेसबूकवरून निशाणा साधल्यामुळे थिसारा परेरानं श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या सीईओंना पत्र लिहिलं. श्रीलंकेच्या सध्याच्या कर्णधाराच्या बायकोनं अशाप्रकारे आरोप केले, तर लोकांना ते खरं वाटेल, असंही परेरा या पत्रात म्हणाला आहे.
मलिंगाच्या बायकोनं केलेल्या आरोपांमुळे ड्रेसिंग रुममध्येही अस्वस्थता आहे. दोन वरिष्ठ खेळाडूंमध्ये असा वाद निर्माण झाल्यामुळे टीममधल्या युवा खेळाडूंसाठीही वातावरण खराब झालं आहे. मतभेद असताना आम्ही टीम म्हणून खेळू शकत नाही. टीमला स्थैर्य देण आणि टीममध्ये एकात्मता ठेवणं, हे कर्णधाराचं काम असतं. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये टीममध्ये तसं काहीच नाही, असा मजकूर या थिसारा परेराच्या या पत्रात आहे.
जानेवारी महिन्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजपासून लसिथ मलिंगाची श्रीलंकेच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१७ साली थिसारा परेरा श्रीलंकेच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार होता. २००९ साली श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, परेराच्या नेतृत्वात श्रीलंकेची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती.