'अरे गिरीश आता तरी सुधार,' अजित पवारांनी विधानसभेतच सुनावलं; म्हणाले, 'कट होता होता वाचला आहेस'

Ajit Pawar on Girish Mahajan : राम शिंदे (Ram Shinde) यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. यानिमित्ताने अजित पवारांनी विधानसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.   

शिवराज यादव | Updated: Dec 19, 2024, 05:07 PM IST
'अरे गिरीश आता तरी सुधार,' अजित पवारांनी विधानसभेतच सुनावलं; म्हणाले, 'कट होता होता वाचला आहेस' title=

Ajit Pawar on Girish Mahajan: महायुतीच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, तरी खातेवाटप अद्याप झालेलं नाही. त्यामुळे सर्वांच लक्ष त्याच्याकडे आहे. दुसरीकडे आज चौथ्या दिवशी विधानपरिषदेमध्ये सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपा आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांची विधानपरिषद सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाषण केलं. भाषण करताना त्यांनी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला. "गिरीश आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू", असं अजित पवार उपहासात्मकपणे म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

राम शिंदे यांची विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला. श्रीकांत भारतीय यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला. प्रस्तावाला मनीषा कायंदे, अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिलं. आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणं झाली. 

अनेक तरुण आमदार निवडून आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत असं अजित पवारांनी सांगितलं. "सभापती महोदय तुम्ही फक्त तरुण नाही तर दिसण्यातही रुबाबदार आहात. आपलं व्यक्तिमत्व प्रभावी आहे. मला आठवत आहे की, 2009 ते 2014 मध्ये आम्ही सत्तेत असताना तुम्ही विरोधी पक्षात यायचा आणि अगदी शांतपणे बसायचात. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि इतर लोक सभागृह चालवायचं काम करायचे. त्यानंतर तुम्ही राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री झालात तेव्हा त्यावेळी तुमची सफारी, देखणेपणा दिसायचा. तुम्हाला पाहून काय बदल झाला अशी आहे चर्चा आमच्यात असायची," असं अजित पवारांनी सांगितलं. 

यावेळी गिरीश महाजन यांनी स्तुती करण्यावरुन विधान केलं. त्यावर अजित पवार म्हणाले, "गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू". अजित पवारांचं हे विधान ऐकल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

राम शिंदे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उभे होते. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांचं आव्हान होतं. रोहित पवारांनी 1100 मतांनी निवडणूक जिंकत विजय मिळवला. यानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये सभा घेतली नाही, असा हल्लाबोल केला होता. यावरूनदेखील अजित पवारांनी विधान केलं. त्यांनी म्हटलंय की, मधल्या काळात राम शिंदे सर तुम्ही म्हणालात अजित पवारांनी माझ्या इथे सभा घेतली नाही. माझ्यामुळे आपला पराभव झाला, असं आपण बोललात. मात्र जे झालं ते चांगल झालं आपण सभापती झालात. कदाचित आपण निवडून आला असता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावं, असे आलं असतं तर गिरीश महाजनांचे मंत्रिपद गेलं असतं.