मुंबई : वर्ल्ड कपनंतर क्रिकेटपासून लांब असणारा धोनी आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डनमध्ये पहिली डे-नाईट टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. या मॅचमध्ये धोनी कॉमेंट्री करताना दिसू शकतो. भारत आणि बांगलादेशमधली ही टेस्ट २२ ते २६ नोव्हेंबरमध्ये खेळवली जाणार आहे.
स्टार स्पोर्ट्सने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला या डे-नाईट टेस्ट मॅचसाठी एक पत्र लिहिलं आहे. भारताच्या माजी टेस्ट कर्णधारांना या मॅचसाठी बोलावण्यात यावं. या माजी कर्णधारांनी मैदानात टीम इंडियासोबत राष्ट्रगीत म्हणावं. तसंच त्यांनी गेस्ट कॉमेंटेटर म्हणून आपल्या टेस्ट कारकिर्दीतले ऐतिहासिक क्षण आणि किस्से सांगावेत, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
जर सौरव गांगुलीने ही विनंती मान्य केली तर धोनी पहिल्यांदाच कॉमेंट्री करताना दिसेल. धोनीला यासाठी निमंत्रणही पाठवण्यात आलं आहे. धोनी वर्ल्ड कपमध्ये त्याची शेवटची मॅच खेळला. यानंतर तो टीममधून बाहेर आहे. अनेकवेळा धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा झाल्या, पण त्याने याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.