गावसकर कर्णधारांवर नाराज, अंपायरकडे केली ही मागणी

टी-20 लीगमधल्या प्रत्येक टीमच्या तीन-तीन मॅच आता झाल्या आहेत.

Updated: Apr 16, 2018, 08:49 PM IST
गावसकर कर्णधारांवर नाराज, अंपायरकडे केली ही मागणी  title=

मुंबई : टी-20 लीगमधल्या प्रत्येक टीमच्या तीन-तीन मॅच आता झाल्या आहेत. यातल्या जवळपास सगळ्याच मॅच हा शेवटच्या बॉलपर्यंत गेल्यामुळे स्पर्धेचा रोमांच वाढला आहे. या स्पर्धेमध्ये बॅट्समन आणि बॉलर दोघंही यशस्वी राहिले आहेत. त्यामुळे कोणताच सामना एकतर्फी झालेला नाही. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद पहिल्या तर मुंबई शेवटच्या क्रमांकावर आहे. अजूनही प्रत्येक टीमच्या ११-११ मॅच बाकी आहेत. त्यामुळे प्ले ऑफला कोणती टीम खेळणार हे शेवटीच कळेल.

गावसकर कर्णधारांवर नाराज

यावर्षीच्या स्पर्धेवर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर खुश आहेत. एका वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभामध्ये गावसकर यांनी बॅट्समन आणि बॉलरचं कौतुक केलं आहे. तसंच यावर्षी स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या खेळपट्ट्याही उच्च दर्जाच्या आहेत. या खेळपट्ट्यांवर तिन्ही फॉरमॅट खेळता येतील, असं गावसकर म्हणाले आहेत. असं असलं तरी कर्णधारांच्या वागणुकीवर गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच अंपायरची भूमिका महत्त्वाची असणार आहे, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली आहे.

कर्णधार वेळ फुकट घालवतायत

मॅचमध्ये रणनिती ठरवण्यासाठी कर्णधार जास्तच वेळ फुकट घालवत आहेत. यामुळे २० ओव्हर वेळेत पूर्ण होत नाहीत, असं गावसकर म्हणाले आहेत. हे सांगताना गावसकर यांनी अश्विन आणि दिनेश कार्तिकची नावं घेतली आहेत. हे दोघंही पहिल्यांदाच कर्णधारपद भुषवत आहेत.

अंपायरची भूमिका महत्त्वाची

कर्णधार वेळ फुकट घालवत असताना अंपायरची भूमिका महत्त्वाचं असल्याचं गावसकर यांनी सांगितलं. कर्णधारांनी कमी वेळ फुकट घालवावा हे सांगणं अंपायरची जबाबदारी आहे. कर्णधार जी वेळ रणनिती बनवण्यासाठी वापरतो ती वेळ प्रेक्षकांच्या काहीच कामाची नसते. प्रेक्षकांना प्रत्येक क्षण मैदानातला रोमांच बघायचा असतो, असं गावसकर यांनी लिहीलं आहे.