close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कॉमेंट्री बॉक्सच्या दरवाजाची काच तुटली, गावस्कर-मांजरेकर थोडक्यात बचावले

पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच झालेल्या लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर मोठा अपघात टळला आहे.

Updated: Nov 7, 2018, 06:25 PM IST
कॉमेंट्री बॉक्सच्या दरवाजाची काच तुटली, गावस्कर-मांजरेकर थोडक्यात बचावले

लखनऊ : पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच झालेल्या लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर मोठा अपघात टळला आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मंगळवारी दुसरी टी-२० मॅच झाली. ही मॅच सुरू व्हायच्या पाच मिनिटं आधी कॉमेंट्री बॉक्सच्या दरवाजाची काट तुटली. या अपघातातून सुनील गावस्कर आणि संजय मांजरेकर थोडक्यात बचावले. मीडिया सेंटरच्या बाजूलाच असलेल्या कॉमेंट्री बॉक्समधून ६ वाजून ५५ मिनिटांनी जोरदार आवाज झाला. हा आवाज ऐकल्यानंतर पत्रकार तिकडे गेले. तेव्हा दरवाज्याच्या काचा पडल्याचं पत्रकारांना दिसलं. आपल्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं मांजरेकर यांनी सांगितलं.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ७१ रननी विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ३ टी-२० मॅचची ही सीरिज २-०नं जिंकली. भारतानं ठेवलेल्या १९६ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १२४ रन करता आले. भारताकडून भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. तर फॅबियन अॅलनला कृणाल पांड्यानं रन आऊट केलं. वेस्ट इंडिजकडून डॅरेन ब्राव्होनं सर्वाधिक २३ रन केले.

या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर भारतानं २० ओव्हरमध्ये १९५-२ एवढा स्कोअर केला. रोहित शर्मानं ६१ बॉलमध्ये नाबाद १११ रनची खेळी केली. यामध्ये ८ फोर आणि ७ सिक्सचा समावेश होता.

भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवननं १२३ रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. शिखर धवननं ४३ रनची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला ऋषभ पंत ५ रनवर आऊट झाला. तर लोकेश राहुलनं १४ बॉलमध्ये नाबाद २६ रन केले. वेस्ट इंडिजकडून खेरी पिरे आणि फॅबियन अॅलेननं प्रत्येकी १-१ विकेट घेतली.