Pat Cummins Hat-Trick : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुपर-8 थरारा सुरु झाला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा (Australia vs Bangladesh) दणदणीत पराभव झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने (Pat Cummins) यंदाच्या हंगामातील पहिल्या हॅटट्रीकची (Hat-Trick) नोंद केली आहे. पॅट कमिन्स टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात हॅटट्रीक घेणारा सातवा तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट लीने 2007 टी20 वर्ल्डमध्ये हॅटट्रीक नोंदवली होती.
पॅट कमिन्सची भेदक गोलंदाजी
पॅट कामिन्सच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ पालापाचोळ्यासारखा उडून गेला. कमिन्सने महमूदुल्लाह (2), मेहदी हसन (0) आणि तौहिद हृदोय (40) यांची विकेट घेत टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये हॅटट्रीक पूर्ण केली. कमिन्सने सामन्याच्या अठराव्या षटकात शेवटच्या दोन चेंडूवर महमूदुल्लाह आणि मेहदी हसन यांना पॅव्हेलिअनमध्ये पाठवलं. त्यानंतर वीसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तौहिद ह्रदोयला बाद करत हॅटट्रीकची नोंद केली.
टी20 वर्ल्ड कपमधील हॅटट्रीक
1. ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, 2007
2. कर्टिस कँपर (आयरलँड) विरुद्ध नीदरलँड, अबू धाबी, 2021
3. वानिंदु हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण अफ्रीका, शारजाह, 2021
4. कागिसो रबाडा (दक्षिण अफ्रीका) विरुद्ध इंग्लंड, शारजाह, 2021
5. कार्तिक मयप्पन (यूएई) विरुद्ध श्रीलंका, जिलॉन्ग, 2022
6. जोशुआ लिटिल (आयरलँड) विरुद्ध न्यूजीलंड, एडिलेड, 2022
7. पॅट कमिंस (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, एंटीगुआ, 2024
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅटट्रीक घेणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज
1. ब्रेट ली विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, 2007
2. एश्टन एगर विरुद्ध दक्षिण अफ्रीका, जोहान्सबर्ग, 2020
3. नाथन एलिस विरुद्ध बांगलादेश, मीरपुर, 2021
4. पॅट कमिंस विरुद्ध बांगालादेश, एंटीगुआ, 2024
पॅट कमिन्सची दमदार कामगिरी
टी20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यात पॅट कमिन्सने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चार षटकात 29 धावा देत 3 विकेट घेतल्या. पॅट कमिन्सच्या भेदक गोलंदाजीला बांगलादेशच्या फलंदाजांकडे कोणतचं उत्तर नव्हतं. तब्बल 17 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला टी20 वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रीक घेण्यात यश आलंय.
बांगलादेशचा पराभव
बांगलादेशने पहिली फलंदाजी करत 8 विकेट गमावत 140 धावा केल्या. नझमल शांतोने सर्वाधिक 41 तर तौहिद हृदोय 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्सने 3 तर अॅडम झम्पाने 2 विकेट घेतल्या. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 2 विकेट गमावत 100 धावा केल्या. अकराव्या षटकानंतर पाऊस आल्याने खेळ थांबवण्यात आला. डीएल मेथडच्या आधारे ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आलं.