...म्हणून भारताने दिलेलं 120 चं टार्गेट गाठता आलं नाही; पराभवानंतर बाबरनं सांगितली 2 कारणं

Babar Azam Says Lost Against India Because Of These 2 Things: भारताने दिलेलं 120 धावांचं छोटसं आव्हानही पाकिस्तानी संघाला पेललं नाही. पाकिस्तानी संघ सामना सहज जिंकेल असं अगदी सामन्याच्या शेवटच्या पाच ओव्हरपर्यंत वाटत असतानाच सामना फिरला आणि भारत जिंकला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 10, 2024, 03:59 PM IST
...म्हणून भारताने दिलेलं 120 चं टार्गेट गाठता आलं नाही; पराभवानंतर बाबरनं सांगितली 2 कारणं title=
पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधाराचं विधान

Babar Azam Says Lost Against India Because Of These 2 Things: भारतीय संघाकडून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने संघाच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. न्यूयॉर्कमधील नौसा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित करणाऱ्या पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. भारतीय संघातील ऋषभ पंत वगळता एकाही खेळाडूला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. भारताच्या शेवटच्या सहा विकेट्स तर अवघ्या 30 धावांमध्ये गेल्या. भारताला अवघ्या 119 धावांवर रोखण्यात पाकिस्तानला यश आलं.

पाकिस्तान सहज जिंकेल असं वाटत होतं

पहिला डाव संपल्यानंतर पाकिस्तान सामना सहज जिंकेल असं वाटत असतानाच बाबरच्या संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसरा पराभव झाला. प्रत्येक चेंडूमागे एक अशा केवळ 120 धावा करायच्या असतानाही पाकिस्तान सामना कसा हरला हा प्रश्न पाकिस्तानी चाहत्यांना पडला आहे. पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान अर्ध्याहून अधिक डाव संपल्यानंतर त्यांना 48 बॉलमध्ये 48 धावा हव्या असताना हाती 8 विकेट्स होत्या तरी 6 धावांनी पराभव कसा झाला यामागील कारण बाबरने सांगितलं आहे.

'या' दोन कारणांमुळे पराभूत झालो

सामन्यानंतर बोलताना बाबर आझमने पाकिस्तानी संघाने वेळोवेळी विकेट्स गामवण्याबरोबरच फार निर्धाव चेंडू खेळणं आम्हाला महागात पडल्याचं म्हटलं आहे. "आम्ही चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी करताना आम्ही एकामागोमाग एक विकेट्स गमावल्या. आम्हाला फक्त धावांचा पाठलाग करायचा होता आणि स्ट्राइक रोटेट करायची होती. दरम्यान एखादा चौकार, षटकार मिळाला तर ती सकारात्मक बाब, एवढा साधा हिशोब होता. मात्र आम्ही फलंदाजी करताना आम्ही फार जास्त निर्धाव चेंडू खेळलो," असं बाबर म्हणाला.

नक्की वाचा >> T20 World Cup: 'ते' 7 रन नसते मिळाले तर भारत पाकिस्तानविरुद्धची मॅच हरला असता; विजयाचे 'खरे हिरो' वेगळेच

फलंदाजीसंदर्भातील नियोजन चुकल्याचंही बाबरने मान्य केलं. "तळाच्या फलंदाजांकडून आपण काय अपेक्षा ठेणार? फलंदाजीमध्ये पहिल्या सहा षटकांचा उत्तम वापर करुन घेण्याचा आमचा मानस होता. मात्र त्यामध्ये एक विकेट गेली आणि आम्हाला त्या षटकांमध्ये हवं ते साध्य करता आलं नाही. खेळपट्टी व्यवस्थित होती. चेंडू अगदी व्यवस्थित बॅटवर येत होता. खेळपट्टी थोडी संथ असल्याने काही चेंडूना जास्त उसळी मिळत होती. आम्हाला शेवटचे दोन सामने जिंकावेच लागणार आहे. आम्ही एकत्र बसून आमच्या चुकांसंदर्भात चर्चा करु. मात्र सध्या तरी आम्ही पुढल्या दोन सामन्यांच्या दृष्टीने विचार करत आहोत," असं बाबर म्हणाला.

नक्की पाहा >> Video: Ind vs Pak मॅचमध्ये High Voltage Drama! सिराजने रिझवानला बॉल फेकून मारला अन्..

...अन् भारताने सामना जिंकला

दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाची मधली फळी या सामन्यात पूर्णपणे कोलमडली. भारताचा डाव 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर आटोपला. भारतीय फलंदाजांपैकी केवळ ऋषभ पंतने 42 धावांची खेळी करत कडवी झुंज दिली. पंतने 31 बॉलमध्ये 42 धावा केल्या. एवढ्या कमी धावसंख्येचा पाठलाग करतानाही पाकिस्तानी संघाचा आरामात विजय होईल असं वाटत होतं. मात्र भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार पुनरागमन केलं. या दोघांनी केलेल्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानी संघ खेळपट्टीवर टीकलाच नाही. बुमराहने 14 धावा देत 3 तर हार्दिकने 24 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. भारताप्रमाणे पाकिस्तानचाही डाव गडगडला आणि त्यांना 20 षटकांमध्ये 113 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हा सामना 6 रनांनी जिंकला.