कोण वीरेंद्र सेहवाग? भर पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या 'या' खेळाडूने विचारला प्रश्न...

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप डीतून बांगलादेशचा संघ सुपर -8 मध्ये प्रवेश करणं जवळपास निश्चित झाला आहे. या कामगिरीनंतर बांगलादेशचे खेळाडू सध्या हवेत आहेत. एका खेळाडूने तर चक्क भर पत्रकार परिषदेत वीरेंद्र सेहवाग कोण असा प्रश्न विचारलाय.

राजीव कासले | Updated: Jun 14, 2024, 05:20 PM IST
कोण वीरेंद्र सेहवाग? भर पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या 'या' खेळाडूने विचारला प्रश्न... title=

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर-8 चा थरार सुरु होईल. ग्रुप एमधून टीम इंडियाने आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर ग्रुप बीमधन ऑस्ट्रेलिया, ग्रुप सीमधून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने तर ग्रुप डी मधून दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशने एन्ट्री मारली आहे. बांगलादेशने नेदरलँडचा पराभव करत सुपर -8 चा दरवाजा उघडलाय. या सामन्यात बांगलादेशचा सर्वात अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनने अर्धशतकी खेळी केली. पण या सामन्यानंतर शाकिब अल हसनसह संपूर्ण बांगलादेशचा संघ हवेत गेलाय. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शाकिब अल हसनने चक्क कोण वीरेंद्र सेहवाग असं विचारलं.

टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागला ओळखत नाही असं क्रिकेट जगतात कदाचीत कोण सापडेल. पण शाकिब अल हसनने कोण वीरेंद्र सेहवाग असं विचारल्याने युजर्सने त्याला चांगलंच धारेवर धरलंय. टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या दोन सामन्यात शाकिब अल हसनला मोठी कामगिरी करता आली नव्हती. यावरुन वीरेंद्र सेहवागने प्रश्न उपस्थित केला होता. बांगलादेशला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 114 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर वीरेंद्र सेहवागने शाकिवर टीका केली होती. शाकिब म्हणजे हेडन किंवा गिलख्रिस्ट नाही, तो एक बांगलादेशी खेळाडू आहे, त्यामुळे त्याने त्याच पद्धतीने खेळायला हवं असं सेहवागने म्हटलं होतं. इतकंच काय तर वीरेंद्र सेहवागने शाकिब अल हसननला क्रिकेटमधऊन निवृत्तीचा सल्लाही दिला होा.

कोण वीरेंद्र सेहवाग?
नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात शाकिबने 46 चेंडूत 64 धावा केल्या. यामुळे तो प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शाकिबने वीरेंद्र सेहवागवरचा राग व्यक्त केला. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने सेहगावने केलेल्या टीकेवर शाकिबला प्रश्न विचारला. पण पत्रकाराचा प्रश्न संपण्याआधीच शाकिबने कोण वीरेंद्र सेहवाग? असं विचारत प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

शाकिब अल हसनने ज्या पद्धतीने पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर दिलं, त्यावरुन त्याला वीरेंद्र सेहवागची टीका चांगलीच झोंबल्याचं दिसंतय. पण केवळ एका सामन्यातील चांगल्या कामगिरीने वीरेंद्र सेहवागवर टीका करणं कितपत योग्य असल्याचा प्रश्न युजर्स विचारताय. नेदरलँड सारख्या दुबळ्या संघाविरुद्ध अर्धशतक करणं फारसं शौर्याचं काम नाही असा सल्लाही युजर्स शाकिबला देतायत.

शाकिब अल हसनने एकदिवसीय आणि टी20 वर्ल्ड कपमध्ये 800  हून अधिक धावा आणि 40 हून अधिक विकेट घेतल्यात. अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटर आहे.