Video: 'काय करतोय? तो आताच..', रोहितने कुलदीपला झापलं! Stump Mic मध्ये झालं रेकॉर्ड

Rohit Sharma Stump Mic Video Against Bangladesh: यापूर्वीही अनेकदा रोहित शर्माचे असे व्हिडीओ समोर आले आहेत. आता टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 23, 2024, 09:01 AM IST
Video: 'काय करतोय? तो आताच..', रोहितने कुलदीपला झापलं! Stump Mic मध्ये झालं रेकॉर्ड title=
रोहितचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Rohit Sharma Stump Mic Video Against Bangladesh: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आपले आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत प्रत्येक सामना जिंकत शनिवारीही आपली विजयी घौडदौड सुरु ठेवली. 22 जून रोजी सुपर 8 च्या सामन्यामध्ये बांगलादेशला भारताने 50 धावांनी पराभूत केलं. आता भारताचा पुढचा सामना उद्या म्हणजेच सोमवारी (24 जून रोजी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाला उपांत्यफेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. एकीकडे आता भारतीय संघाचं लक्ष पुढील सामन्याकडे असतानाच शनिवारी झालेल्या सामन्यातील रोहित शर्माचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

अनेकदा रोहितची वक्तव्य स्टम्प माईकमध्ये होतात कैद

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्माने फिरकीपटू कुलदीप यादवला झापत असल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा भारतीय गोलंदाजांना कर्णधार म्हणून वेळोवेळी सल्ले देताना पाहायला मिळतो. बरं रोहित हा त्याच्या खास शैलीत मैदानावरील सूत्रं हाताळतो. अगदी त्यासाठी अपशब्द वापरावे लागले तरी तो मागे-पुढे पाहत नाही. यापूर्वी अनेकदा त्याची अशी वक्तव्यं स्टम्प माईकमध्ये कैद झाली आहेत. असाच प्रकार शनिवारीही घडला.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय म्हणाला रोहित

शनिवारच्या सामन्यातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्माने कुलदीप यादवला गोलंदाजीच्या शैलीवरुन झापलं. बांगलादेशी फलंदाजाला आडवा फटका मारु दे, असं रोहित कुलदीपला सांगताना दिसत आहे. आताच एकजण आडवा फटका मारण्याच्या नादात बाद झाला आहे. याला पण मारु दे आडवा फटका, असं रोहित कुलदीपला गोंदाजीत बदल करण्यासंदर्भातील सूचना देताना ऐकवत असल्याचं दिसत आहे. "काय करतोय यार, आडवा फटका मारु दे ना. आताच आलाय तो क्रिजवर. एकजण आताच आडवा फटका मारताना परतलाय. याला पण मारु दे आडवा फटका," असं रोहित कुलदीपला सांगताना दिसतोय. रोहितचं हे बोलणं ऐकून कॉमेंट्री करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूनेही रोहितच्या या भूमिकेचं कौतुक केलं. "आडवं मारु दे, आता आला आहे, वगैरे बोलतोय कर्णधार. याला म्हणतात आक्रामकपणे नेतृत्व करणं," असं म्हणत सिद्धू म्हणाला.

सर्वाधिक विकेट्स कुलदीपनेच घेतल्या

भारत आणि बांगलादेश सामन्यामध्ये बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 196 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्याने नाबाद 50 धावांची खेळी केली. त्यापूर्वी विराट कोहलीने 37 तर ऋषभ पंतने 36 धावांची उत्तम खेळी केली. 197 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 146 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताने सामना 50 विकेट्सने जिंकला. भारताने घेतलेल्या 8 विकेट्सपैकी सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स कुलदीपनेच घेतल्या.