Hello, New York Police! भारत-पाक सामन्यानंतर दिल्ली पोलिसांचा न्यूयॉर्क पोलिसांना फोन... नेमकं काय घडलं

Ind vs Pak T20 World cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयाबरोबरच वर्ल्ड कप स्पर्धेत जिंकण्याची परंपराही भारताने कायम ठेवली आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 10, 2024, 02:58 PM IST
Hello, New York Police! भारत-पाक सामन्यानंतर दिल्ली पोलिसांचा न्यूयॉर्क पोलिसांना फोन... नेमकं काय घडलं title=

Ind vs Pak T20 World cup 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) पुन्हा एकदा करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. टी20 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त चुरशीच्या झाालेल्या सामन्यात टीम इंडियाने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा 6 धावांनी पराभव (India defeat Pakistan) केला. टी20 वर्ल्ड कप 2024 मधला भारताचा हा सलग दुसरा विजय ठरलाय. तर पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव ठरलाय. या पराभवामुळे पाकिस्तानचा स्पर्धेतील प्रवासही धोक्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंट क्रिकेट स्टेडिअमवर झालेला भारत-पाक सामन्यासाठी स्टेडिअममध्येही प्रेक्षकांनी विक्रमी गर्दी केली होती.

दिल्ली पोलिसांचा न्यूयॉर्क पोलिसांना फोन
टॉस जिंकून पाकिस्तानने भारताला पहिली फलंदाजी दिली. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 119 धावांवर ऑलआऊट झाला. विजयाचं हे माफक आव्हान समोर ठेऊन खेळताना पाकिस्तानचा संघ 7 विकेट गमावत केवळ 113 धावा करु शकला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी पुरती शरणागती पत्करली होती. भारताच्या विजयानंतर दिल्ली पोलिसांनी एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाली आहे. 

दिल्ली पोलिसांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये पाकिस्तानला डिवचण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या पोस्टमध्ये म्हटलंय 'हॅलो न्यूयॉर्क पोलीस.. सामन्यानंतरकेवळ दोन आवाज येत होते, एक 'इंडिया... इंडिया' आणि दुसरा आवाज होता, टेलिव्हिजन फुटण्याचा, कृपया तुम्ही याची पृष्टी करु शकता का? दिल्ली पोलिसांच्या या पोस्टवर क्रिकेट चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दिल्ली पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये न्यूयॉर्क पोलिसांना टॅग केलं आहे. 

पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव
न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर पहिली फलंदाजी करताना टीम इंडिया अवघ्या 119 धावांवर ऑलआऊट झाला. ऋषभ पंतव्यतिरिक्त टीम इंडियाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टीकाव धरु शकला नाही. पंतने 31 चेंडूत 42 धावा केल्या. याशिवाय अक्षर पटेलने 20 धावा केल्या. पाकिस्तानतर्फे नसीम शहाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर मोहम्मद आमिरने दोन विकेट घेतल्या. 

बुमराहने बाजी पलटवली
विजयाचं माफक आव्हान पाकिस्तान सहज पार करणार असं वाटत होतं, पाकिस्तानने सुरुवातही दमदार केली. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमने चांगली सुरुवात केली. पण भारताच्या बुम बुम बुमराहने संपूर्ण बाजी पलटवली. बुमराहने बाबर आझम, नंतर मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद या महत्वाच्या विकेट घेत अशक्य विजय शक्य करुन दाखवला. बुमराहच्या या कामगिरीमुळेच त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' जाहीर करण्यात आलं. बुमराने चार षटकात अवघ्या 14 धावा देत तीन विकेट घेतल्या.

जसप्रीत बुमराहला अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराजचीही चांगली साथ मिळाली. हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंगने एक विकेट घेतली.