USA च्या जर्सीवर Amul, आयर्लंडच्या जर्सीवर Nandini; हे ब्रॅण्ड टीम इंडियाला स्पॉन्सर का नाही करत?

Indian Brands Sponsors in T20 World Cup 2024: भारतीय संघांच्या जर्सीवर ड्रीम 11 चं ब्रॅण्डींग दिसत असलं तर काही परदेशी संघाच्या जर्सीवर अमूल आणि नंदिनी या भारतीय कंपन्यांचे लोगो पाहायला मिळत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 19, 2024, 02:43 PM IST
USA च्या जर्सीवर Amul, आयर्लंडच्या जर्सीवर Nandini; हे ब्रॅण्ड टीम इंडियाला स्पॉन्सर का नाही करत? title=
अनेक भरतीय कंपन्यांचे लोगो

Indian Brands Sponsors in T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जात आहे. अमेरिकेतील 3 मैदानांवर तर वेस्ट इंडिजमधील 6 मैदानांवर या स्पर्धेतील सामने खेळवले जात आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या साखळी फेरीमध्ये सहभागी झालेल्या 20 संघाच्या जर्सींपैकी अनेक संघांच्या जर्सींवर भारतीय कंपन्यांचे ब्रॅण्ड स्पॉन्सर्स म्हणून दिसून येत आहेत. अगदी ड्रीम इलेव्हन पासून ते अमूलपर्यंतचे ब्रॅण्ड जर्सींवर दिसत आहेत. केवळ भारतच नाही तर अनेक परदेशी संघांच्या जर्सीवरही भारतीय कंपन्यांचे लोगो दिसत आहेत. पण हे असं का? याचसंदर्भात जाणून घेऊयात...

कोणत्या परदेशी संघांशी भारतीय कंपन्यांचे करार

भारतामधील दुग्ध व्यवसायातील सर्वात प्रसिद्ध ब्रॅण्ड असलेली अमूल कंपनी अमेरिकी तसेच दक्षिण आफ्रिकन संघाच्या जर्सीवर दिसून येत आहे. तर दुसरीकडे कर्नाटकमधील दुग्ध व्यवसायामधील अग्रगण्य संस्था असलेल्या नंदिनी कंपनीचा लोगो आयर्लंड आणि स्कॉटलंडच्या जर्सीवर दिसून येत आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिय संघाबरोबर एचसीएल कंपनीने डिजीटल पार्टनर म्हणून करार केला असून ही कंपनी 2019 पासून ऑस्ट्रेलियन संघाशी संलग्न आहे. भारतीय कंपन्या अंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये मोठ्याप्रमाणात जाहिरातींच्या माध्यमातून पैसा ओतताना दिसत आहेत. यामागे वेगवेगळी कारणं आहेत. 

भारतीय संघासाठी स्पॉन्सरशीप किती?

अशा जाहिरातील कंपन्यांना फारच परवडणाऱ्या असून या स्पर्धांच्या माध्यमातून कंपन्यांना अधिक व्हिजीबिलीट मिळत आहे. जाहिरातदारांची गर्दी टाळून आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची ही संधी असल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. 2023 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारतीय संघासाठी प्रमुख प्रायोजक होण्यासाठी म्हणजेच मेन स्पॉन्सर म्हणून किमान रक्कम 350 कोटी रुपये इतकी निश्चित केली आहे. ड्रीम इलेव्हन कंपनीने 358 कोटींना हा करार केला असून म्हणूनच भारतीय जर्सीवर त्यांचा लोगो दिसतो.

...म्हणून परदेशी संघांना स्पॉन्सरशीप

दुसरीकडे, कर्नाटकमधील नंदिनी कंपनीने स्कॉटलंड आणि आयर्लंड या दोन्ही संघांबरोबर स्पॉन्सरशीपचा करार प्रत्येक टीमसाठी 2.5 कोटी रुपये इतक्या स्वस्तात केला आहे. म्हणजेच अवघ्या 5 कोटी रुपयांमध्ये नंदिनी दूध कंपनीचा लोगो दोन संघांच्या जर्सीवर झळकत आहे. ही रक्कम भारतीय संघाच्या किमान रक्कमेपेक्षा 196 टक्के कमी आहे. आता हे सहाजिक आहे की भारतीय कंपन्यांना एवढा पैसा देणं परवडत नसल्याने ते परदेशी संघांना स्पॉन्सरशीप देतात.

भारतीय ब्रॅण्डला स्पॉन्सरशीप दिल्याचा फायदा काय?

भारतीय संघ अ गटामध्ये असून पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा या संघांचे सामने भारतीय चाहत्यांकडून अधिक पाहिले जातील असं सांगितलं जात आहे. या गटातून कोण पुढं जातं यासाठी गटातील इतर संघांच्या सामन्यांवरही आणि पर्यायाने जर्सींवर भारतीय प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे. नंदिनी कंपनीच्या एका अंदाजानुसार, टी-20 वर्ल्डकपमधून त्यांना एकूण 84 कोटी व्ह्यूज मिळणार असून जागतिक स्तरावर ब्रॅण्डींगची आणि नव्या ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळणार आहे. अमेरिकी मार्केटमध्ये शिरकाव करण्यासाठी कंपन्यांना यंदाचा टी-20 वर्ल्ड कप उत्तम संधी असल्याने कमी पैशांमध्ये उत्तम डील मिळाल्याने अनेक भारतीय कंपन्यांनी परदेशी संघांनाही स्पॉन्सरशीप दिली आहे.