'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट

T20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणत्या एका सिक्रेटमुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा सेमी-फायनलचा सामना जिंकला याबद्दल खुलासा केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 28, 2024, 10:06 AM IST
'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट title=
सामना जिंकल्यानंतर रोहितचा खुलासा

T20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये अपराजित राहत धडक मारली आहे. भारताने गुरुवारी गतविजेत्या इंग्लंडच्या संघाचा 68 धावांनी धुव्वा उडवत अगदी दिमाखदार पद्धतीने फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघाच्या विजयामध्ये फलंदाजांबरोबर गोलंदाजांनीही तोलामोलाची कामगिरी करत विजय सुखकर करुन दिला. या विजयानंतर बोलताना कर्णधार रोहित शर्माने भारताची फलंदाजी झाल्यानंतर गोलंदाजीला मैदानात उतरण्यापूर्वी संघात झालेल्या चर्चेबद्दल खुलासा केला आहे. याच चर्चेमध्ये ठरलेला एक डावपेच सेमी-फायनल जिंकण्यासाठी कारणीभूत ठरल्याचं रोहितच्या बोलण्यावरुन स्पष्ट झालं आहे.

या एका गोष्टीमुळे मिळाला विजय

"हा विजय फार समाधान देणार आहे. यासाठी आम्ही संघ म्हणून फार मेहनत घेतली आहे. आम्ही सर्वांनी मिळून छान कामगिरी केली. आम्ही फार लवकर येथील परिस्थितीशी जुळवून घेतल्याचा फायदा झाला. येथील एकंदरित परिस्थिती आव्हानात्मकच होती. मात्र परिस्थितीशी जळवून घेतच आतापर्यंत या स्पर्धेत आम्ही यश संपादन केलं आहे. फलंदाज आणि गोलंदाजींनी परिस्थितीशी जुळवून घेतल्यास सारं काही मनासारखं घडतं," असं रोहितने सामन्यानंतर मत व्यक्त करताना सांगितलं.

आधी 140 ते 150 चं टार्गेट डोक्यात होतं पण...

"आम्ही सामन्यामध्ये एका क्षणी 140-150 च्या आसपास धावसंख्या पोहचावी असा विचार करत होतो. मात्र फलंदाजी करताना मधल्या ओव्हरमध्ये आम्ही भरभर धावा जमवल्या. त्यामुळे मी आणि सूर्यकुमार फलंदाजी करताना आपण अधिकच्या 20 ते 25 धावा करु शकतो असं आम्हाला वाटतं. त्यावेळेस 175 हे उत्तम टार्गेट ठरु शकतं असं वाटतं होतं," असं रोहितने सांगितलं.

मी टार्गेट सेट करतो पण...

"मी माझ्या डोक्यात टार्गेट सेट करु शकतो. मात्र मी याबद्दल कोणत्याही फलंदाजाला काही सांगत नाही. त्यांना परिस्थिती हेरता येते. मला या खेळपट्टीवर 170 पर्यंतची धावसंख्या उत्तम वाटत होती," असं रोहित म्हणाला.

पहिल्या इनिंगनंतर काय चर्चा झाली?

रोहितने गोलंदाजांवर कौतुकाचा वर्षाव केला. "गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. अक्षर, कुलदीप यांनी उत्तम फिरकी गोलंदाजी केली. असल्या परिस्थितीमध्ये फिरकीपटूंना खेळवून पाहण्याचा निर्णय घेतला. दबाव असतानाही ते शांतपणे खेळले हे विशेष. आम्ही पहिल्या इनिंगनंतर एकत्र चर्चा केली. आम्ही असं ठरवलं होतं की स्टम्पवर गोलंदाजी करायची. गोलंदाजांनी तेच केलं," असं रोहित गेम प्लॅनचा खुलासा करताना म्हणाला. रोहित म्हणाला तेच सामन्यात दिसून आलं. सुरुवातीला इंग्लंडच्या सलामीवीरांनी फटकेबाजी केल्यानंतरही भारतीय गोलंदाज स्टम्पवरच गोलंदाजी करत होते. बॉल अचानक उसळी घेत नसल्याने फलंदाजी अवघड झालेली. याचाच फायदा भारतीय गोलंदाजांना झाला. इंग्लडचे तीन खेळाडू बोल्ड झाले तर तिघे एलबीडब्लू झाले यावरुनच भारतीय गोलंदाजींनी स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी केल्याचं स्पष्ट होत आहे.

इंग्लंडची शरणागती

भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी 172 धावांचा पाठलाग करताना नांगीच टाकली. भारतीय संघाने इंग्लंडला 16.4 ओव्हरमध्येच 103 धावांवर बाद केलं. भारतीय संघ आता फायनलमध्ये शनिवारी म्हणजेच 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बार्बाडोसच्या मैदानावर उतरेल. भारतीय संघ तब्बल 10 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

गोलंदाज चमकले

सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अक्षर पटेलने इंग्लंडच्या 3 महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याला कुलदीप यादवने उत्तम साथ दिली. अक्षरने 23 धावा देत 3 बळी घेतले तर कुलदीपने इतकेच बळी घेण्यासाठी अवघ्या 19 धावा दिल्या.